रेल्वेतून मद्यतस्करीचा पर्दाफाश 

योगेश बरवड
Wednesday, 4 November 2020

लॉकडाऊननंतर रेल्वेतून होणाऱ्या मद्यतस्करीला ब्रेक लागला होता. दरम्यानच्या काळात मद्यतस्करीचे एकच प्रकरण समोर आले होते. सणासुदीच्या तोंडावर रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही संधी साधत मद्यतस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत.

नागपूर : लॉकडाऊननंतर मद्यतस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत. कमी जोखमीचा पर्याय म्हणून रेल्वेतून दारू वाहतुकीला प्राधान्य देत आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर थांबलेल्या जीटी एक्स्प्रेसमध्ये कारवाई करीत बेवारस आढळलेला मद्यसाठा जप्त केला. हा मद्यसाठा दारूबंदी असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात विक्रीसाठी नेला जात असावा, असा कयास लावला जात आहे. 

लॉकडाऊननंतर रेल्वेतून होणाऱ्या मद्यतस्करीला ब्रेक लागला होता. दरम्यानच्या काळात मद्यतस्करीचे एकच प्रकरण समोर आले होते. सणासुदीच्या तोंडावर रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही संधी साधत मद्यतस्कर पुन्हा सक्रिय झाले आहेत.

हलगर्जीपणाचा कळस! मृतदेहाला भलत्याच व्यक्तीच्या नावाचं टॅग; दुसऱ्याच  औषधांमुळे जीव गेल्याचा आरोप

अनधिकृत विक्रेत्यांना आळा घालण्यासह गुन्हे अन्वेषणासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक तयार केले. या पथकातील सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, भारत माने, कामसिंह ठाकूर, श्याम झाडोकार, अमित बारापात्रे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक विनोद भोयर व चंदू गोबाडे मंगळवारी नागपूर स्थानकावर नियमित तपासणी करीत होते.

दुपारी १२.२० वाजताच्या सुमारात ०२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी स्पेशल एक्स्प्रेस नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर येऊन थांबली. विशेष पथकातील सदस्यांनी वेगवेगळ्या डब्यांचा ताबा घेत तपासणी सुरू केली. एस-३ क्रमांकाच्या डब्यात दोन बॅग बेवारस आढळल्या. जवानांनी गाडीतील प्रवाशांकडे विचारपूस केली. पण, कुणीही हक्क दाखविला नाही. संशय बळावल्याने बॅगची तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याच्या ३६५ बाटल्या आढळल्या. हा मद्यसाठा मद्यप्रदेशात निर्मित असून, एकूण किंमत ३१ हजारांवर आहे. आरपीएफकडून कायदेशीर प्रक्रियेनंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी राज्य उत्पदन शुल्क विभागाकडे वर्ग करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अज्ञात तस्कराविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: liquor smuggling exposed by RPF