एलआयटीही जाणार 'नॅक' मूल्यांकनासाठी, दर्जा मिळताच अभिमत विद्यापीठासाठी करणार प्रयत्न

मंगेश गोमासे
Sunday, 18 October 2020

'एलआयटी'ला स्वायत्त संस्था करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. त्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालण्यात आले होते.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीद्वारे (एलआयटी) नॅक मूल्यांकनासाठी अर्ज करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. विद्यापीठाचा 'सेल्फ स्टडी रिपोर्ट' (एसएसआर)पाठविल्यावर एलआयटीचा 'सेल्फ स्टडी रिपोर्ट' (एसएसआर) तयार करण्यात येणार आहे. यानंतर राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदेकडून (नॅक) एलआयटीचे मूल्यांकन केले जाईल. नॅककडून दर्जा मिळताच एलआयटीद्वारे अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

विद्यापीठाद्वारे एलआयटी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय आणि बॅरि. शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालय संचालित करण्यात येते. या महाविद्यालयांची गुणवत्ता वाढावी यासाठी विद्यापीठाकडून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. मात्र, महाविद्यालयांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी गेल्यावेळी बॅरि. शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनाची परवानगी मागितली होती. मात्र, त्यावेळी विद्यापीठाने रिक्त पदांचे कारण समोर करून ती परवानगी नाकारली होती. यानंतरही महाविद्यालयाकडून नॅकसाठी अर्ज करण्यात आला होता.

हेही वाचा - रेल्वे चुकली अन् तरुणाला सापडला उद्योगाचा मार्ग; आता करतोय हजारोंची उलाढाल

दरम्यान 'एलआयटी'ला स्वायत्त संस्था करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. त्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालण्यात आले होते. त्यानंतर महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना साकडे घालण्यात आले होते. मात्र, आता ते त्या खात्याचे मंत्री नसल्याने त्यावरील निर्णय अद्याप थंडबस्त्यात पडला आहे. त्यामुळे एलआयटीने 'अभिमत विद्यापीठ' दर्जा मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे ठरविले आहे. यासाठीच काही महिन्यांपूर्वीच एलआयटीने विद्यापीठाकडून नॅक मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची परवानगी घेतली. यासाठी आता नियमित प्राध्यापकांची अट शिथिल करण्यात आली असल्याने नॅक मूल्यांकनासाठी 'सेल्फ स्टडी रिपोर्ट' (एसएसआर) तयार करण्यात येणार आहे. तो तयार होताच, एलआयटीद्वारे 'अभिमत विद्यापीठ'चा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करणार आहे. 

हेही वाचा - आई- वडील नाही मुलांचे बना मित्र! जाणून घ्या...

एनबीए अशक्‍यच -
विद्यापीठाच्या प्रत्येक अभ्यासक्रमाला 'एनबीए'चा दर्जा मिळावा यासाठी एलआयटीद्वारे बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यासाठी ८० टक्के पद भरती करणे गरजेचे आहे. सहा महिन्यांपूर्वी १७ पदांसाठी जाहिरात देत, पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, ८० टक्के पद भरल्यावरही त्या पदांना तीन वर्षांचा कालावधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्यातरी एलआयटीला 'एनबीए' दर्जा मिळणे जवळपास अशक्‍य आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lit nagpur will send self study report for naac gradation