
कार्यकाळात अनेक गुंडांनी शहर सोडले तर क्रिकेट सट्टेबाज आणि जुगार अड्डा संचालकांनी धंदे बंद केले.
नागपूर ः उपराजधानीतील कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा सफाया अभियान गुन्हे शाखेने राबविले. डॉन आंबेकरचे गुन्हेगारीतील प्रस्थ, प्रशस्त घर आणि त्याची दहशतीचा अंत गुन्हे शाखेने केला. तर उपराजधानी तब्बल ९० हत्याकांडांनी हादरली. या घटनांमध्ये राणे दाम्पत्याच्या हत्याकांडामुळे २०२० वर्ष गाजले. या घटनेमुळे पती-पत्नीचे नाते आणि मुलांवरील असलेले प्रेमही फिके पडले. तसेच उपराजधानीला नवे पोलिस आयुक्तसुद्धा लाभले. कडक शिस्तीचे आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपूरला शिस्त लावण्यासाठी नवे उपक्रम राबविणे सुरू केले.
त्यांच्या कार्यकाळात अनेक गुंडांनी शहर सोडले तर क्रिकेट सट्टेबाज आणि जुगार अड्डा संचालकांनी धंदे बंद केले. डॉक्टर असलेल्या पत्नीने पतीच्या वागणुकीला कंटाळून पती, मुलगा आणि मुलीला विषाचे इंजेक्शन देऊन तिघांचा खून केला. तर अंबीझरीत मुलीच्या प्रियकराने प्रेयसीची आजी लक्ष्मी धुर्वे आणि भाऊ यश धुर्वे यांना चाकूने भोसकून ठार केले.
हेही वाचा - शीतल आमटेंच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला समोर
खंगार मायलेकींनी घरगुती वादातून अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले. एमआयडीसीत एका कंपनीच्या मॅनेजरला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून एका युवतीने तीन साथिदारांच्या मदतीने खंडणी वसूल केल्याची घटना गाजली. त्यानंतर महिला डॉन प्रीती दास हिचे कांड गाजले. तिने अनेकांनी जाळ्यात ओढून लाखोंनी लुटमार केली. प्रीती दासचे संबंध राजकीय वर्तुळात असल्यामुळे ते प्रकरण चांगलेच गाजले.
बाल्या बिनेकर हत्याकांड
खामल्यातील एका बड्या सामाजिक कार्यकर्त्याच्या बर्थडे पार्टीत कुख्यात गुंड बाल्या बिनेकर याचा गेम करण्याचा कट रचण्यात आला. बाल्याला भरचौकात १० जणांनी चाकू-तलवारने खूपसून खून केला. या हत्याकांडाचे सीसीटीव्ही फुटेज राज्यभर पोहचले होते. उपराजधानीत आयपीएस अधिकारी नुरूल हसन यांनी १०० कोटींचा मेट्रोव्हीजन घोटाळा उघडकीस आणला. यामध्ये १५ आरोपींना अटक केली तर ४ कोटींची संपत्ती पोलिसांनी जप्त केली. साहिल सैयद आणि डॉ. प्रवीण गंटावार यांचे प्रकरण चांगलेच गाजले. साहिलवर गुन्हे दाखल करण्यात आले. महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार कांडातील तपासात अनेक चढ-उतार आले. शेवटी हे प्रकरणी सीआयडीकडे तपासासाठी देण्यात आले.
नक्की वाचा - आमदारांसाठीही पदवी अनिवार्य करणार का? ग्रामपंचायत निवडणुकीत शिक्षणाच्या अटीचा विरोध करत...
पोलिस आयुक्त बदलले
पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची बदली झाली आणि अमितेश कुमार नवे पोलिस आयुक्त म्हणून रूजू झाले. ते रूज होताच त्यांनी पोलिस खात्यात शिस्त लावण्यावर भर दिला. जुगार अड्डे. क्रिकेट सट्टा आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न केला. तसेच आंतरिक बदल करून अनेकांना सुधरण्याची संधी दिली तर नव्या दमाच्या अधिकाऱ्यांवर विश्वास दर्शविला. अनेक ऑपरेशन राबवून पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
संपादन - अथर्व महांकाळ