महादेवाचा नंदी म्हणतो कोरोना जाईल पळून अन् पूर्वीचे सुखाचे दिवस येतील परत

सतिश तुळस्कर
Friday, 2 October 2020

नंदीवाला बी लई हुश्‍शार ! कुणाच्या दारापुढे उभा असलेला नंदी, दानधर्म करण्यासाठी येत असलेल्या महिलेला पाहून नंदीवाला विचारतो, कोरोना केव्हा जाईल, तेव्हा नंदी मानेनेच खुणावतो आणि त्याने सांगितलेले भविष्य मनाला सुखावून जाते, चला हेही नसे थोडके ! नंदीवाल्याचा पोट  भरण्याचा व्यवसायच तो.  

उमरेड (जि.नागपूर) : सद्या जगात कोरोनाचे भूत प्रत्येकाच्या मानगुटीवर बसलेले आहे. विदेशातून आलेला हा विचित्र, विदृप आणि भयानक पाहुणा ये,थून हलायला तयार नाही. आणखी किती दिवस मुक्कामी राहणार तेच कळत नाही. आज जाईल, उद्या जाईल म्हणता तो जायचे नाव घेत नाही. हट्टी आणि जीवघेणा हा पाहुणा कधी जाणार ते ऐकण्यास उत्सुक असलेल्यांना मात्र कोरोनाचे भविष्य सांगणारा भविष्यवेत्ता नंदीत दिसायला लागतो. नंदीवाला बी लई हुश्‍शार ! कुणाच्या दारापुढे उभा असलेला नंदी, दानधर्म करण्यासाठी येत असलेल्या महिलेला पाहून नंदीवाला विचारतो, कोरोना केव्हा जाईल, तेव्हा नंदी मानेनेच खुणावतो आणि त्याने सांगितलेले भविष्य मनाला सुखावून जाते, चला हेही नसे थोडके ! नंदीवाल्याचा पोट  भरण्याचा व्यवसायच तो.  

 माणूस अनेक प्राण्यांचा वापर करत त्यांच्या सोबतीने समाजात कलाकौशल्य दाखवून मिळालेल्या थोड्या मिळकतीत आपला व परिवाराचा उदरनिर्वाह चालवतो. असाच एक आकाश भोयर नावाचा तरुण तालुक्यातील पाचगाव जवळील सालाईमेंढा गावचा रहिवासी असून त्याचा पिढीजात व्यवसाय करतो. पाठीवर नक्षीदार झूल पांघरलेला तसेच कवड्यांची माळा गळ्यात घालून सजविलेल्या एका नंदीला घेऊन गावोगावी, खेडोपाडी फिरत महादेवाची गाणी, भजने गाऊन लोकांना मंत्रमुग्ध करतो व त्या मोबदल्यात उदरनिर्वाह करण्यापुरते कमवितो.

अधिक वाचाः आता भोंग्याचा आवाजही कानी पडत नाही आणि रस्त्यावरचा माणसाचा लोंढाही दिसत नाही...

अधिकमासात केला जातो दानधर्म
देवाधिदेव महादेवाचे प्रिय वाहन म्हणजे नंदी. लोक त्या नंदयाची पूजा करून त्यांना दानदक्षिणा देतात आणि महत्वाचे म्हणजे सध्या सुरू असलेला पुरुषोत्तम मास अर्थात अधिकमास या नावाने प्रचलित असलेल्या महिन्यात दानधर्माला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हिंदू धर्मात अति पवित्र मानला जाणारा हा अधिकमास अर्थात पुरुषोत्तममास या महिन्यात भजन, कीर्तन, प्रवचन तथा पौराणिक ग्रंथांचे पारायण मोठ्या प्रमाणात साजरा करतो. याशिवाय अनेक ठिकाणी जावयाला, भाच्याला विधिवत दानधर्म करण्याची प्रथा अनादिकालापासून प्रचलित आहे.

अधिक वाचाः काट्यागोट्यातून चालताना पायाचेही लोखंड झाले! पण कधी फुले बरसली नाहीत

सुवर्णाची सूरी देवा नको ठेवू मानेवरी!
मात्र यंदा सर्व जगात त्राही त्राही करून सोडणाऱ्या कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्व धार्मिक विधी करण्यास बंधने आली आहेत. त्यामुळे घरच्या घरीच सर्व विधी मोजक्या स्वरूपात पार पाडावी लागतात.  हा नंदीचा मालक आपला नंदी घेऊन ‘येतो देवा येतो गा, येतो माथ्यावरी , स्वर्णाची सूरी देवा नको ठेवू मानेवरी’ अशाप्रकारे महादेवाची गाणी तालासुरात म्हणून लोकांची मने जिंकतो. तेव्हा ज्या घराच्या दारात तो उभा राहतो, त्या घरची महिला त्या दोघांची पण पूजा करून औक्षवण करत दानधर्म विधी पार पाडते. दान घेतल्यानंतर बैलांचा मालक विचारतो आशीर्वाद देशील का, तर तो मान हलवून आशीर्वाद दिल्याचा इशारा देतो. तसेच कोरोनासुद्धा लवकर पळून जाणार असल्याचे संकेतसुद्धा तो देत असतो.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadev's Nandi says Corona will run away and the happy days of the past will come back