मेट्रोत धुडगूस घालणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार; प्रशांत पवार यांच्यावर जुगाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

राजेश प्रायकर 
Friday, 22 January 2021

शेखर शिरभाते यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी मेट्रोच्या `सेलिब्रेशन ऑन व्हील्स' योजनेंतर्गत मेट्रो बुक केली होती. बुधवारी सायंकाळी शिरभाते मित्रांसह मेट्रोत पोहोचले. यात प्रामुख्याने जय जवान, जय किसान संघटनेचे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रशांत पवार, राहुल कोल्हे आदींसह पन्नासपेक्षा जास्त जणांचा समावेश होता. 

नागपूर ः वाढदिवसानिमित्त मेट्रो भाड्याने घेत त्यात जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध सामान्य प्रवासी संताप व्यक्त करीत असतानाच महामेट्रोने आज सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. `सेलिब्रेशन ऑन व्हील्स' योजनेअंतर्गत मेट्रो बुक करणारे शेखर शिरभाते यांच्यासह ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे प्रशांत पवार व इतर साथीदारांविरुद्ध जुगारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी महामेट्रोने तक्रारीत केली आहे.

शेखर शिरभाते यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी मेट्रोच्या `सेलिब्रेशन ऑन व्हील्स' योजनेंतर्गत मेट्रो बुक केली होती. बुधवारी सायंकाळी शिरभाते मित्रांसह मेट्रोत पोहोचले. यात प्रामुख्याने जय जवान, जय किसान संघटनेचे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रशांत पवार, राहुल कोल्हे आदींसह पन्नासपेक्षा जास्त जणांचा समावेश होता. 

 हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या...

गणा मार्गावर मेट्रो सुरू होताच तृतीयपंथीयांचे नृत्य सुरू झाले. त्यानंतर येथे जुगार खेळण्यात आला. विशेष म्हणजे या सर्व घटनेचे व्हीडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली. मेट्रोने सामान्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचा दुरुपयोग केला जात असल्याची भावना नागपूरकरांत निर्माण झाली. 

एवढेच नव्हे अनेकांनी या घटनेचा निषेधही केला. शहराला बदनाम करण्याचे कारस्थान करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणीही काहींनी केली. अखेर आज महामेट्रोच्या देखभाल, दुरुस्ती विभागाने सीताबर्डी पोलिस स्टेशन गाठले. मेट्रो प्रवासात तृतीय पंथियांसोबत असभ्य वर्तन, त्यांच्यावर पैसे उधळणे व जुगार खेळण्यात आल्याची गंभीर दखल घेत जुगारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महामेट्रोने तक्रारीत केली आहे.

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

अशोभनीय व्यवहार करू नये‘`

मेट्रोत प्रवासादरम्यान कुणीही अशोभनीय व्यवहार करू नये, असे आवाहन महामेट्रो प्रशासनाने केले आहे. शहरातील नागरिकांना प्रदूषणमुक्त व माफक दरात प्रवासासाठी मेट्रो आहे. याशिवाय विविध उपक्रमातून नागपूरकरांच्या आनंदात भर घालण्याचाच मेट्रोचा प्रयत्न असल्याचेही महामेट्रोने कळविले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahametro charges FIR against people playing cards in Metro