मजबुती का नाम महात्मा गांधी हेच खरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

जनमंच संस्थेतर्फे "जनसंवाद' या उपक्रमांतर्गत त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते "गांधी का मरत नाही' या विषयावर बोलत होते. व्याख्यानात त्यांनी लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, गोळवलकर गुरुजी आदींवर कठोर शब्दामध्ये टीका केली. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे, सचिव नरेश क्षीरसागर उपस्थित होते.

नागपूर : "महात्मा गांधींमुळे मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो', असे विधान बराक ओबामा यांनी भारतात आल्यानंतर केले होते. ही त्यांची "मजबुरी' असू शकते. मोदी विदेशात जातात तेव्हा त्यांना महात्मा गांधींवर उद्‌गार काढावे लागतात. ही त्यांची "मजबुरी' असू शकते. आपण "मजबुती का नाम महात्मा गांधी' असे म्हणायला हवे. मात्र, "मजबुरी का नाम गांधीजी' असूच शकत नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी व्यक्त केले.

अवश्य वाचा - युवतीने केला ‘स्पीड चेक’ अन घडले हे

जनमंच संस्थेतर्फे "जनसंवाद' या उपक्रमांतर्गत त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते "गांधी का मरत नाही' या विषयावर बोलत होते. व्याख्यानात त्यांनी लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, गोळवलकर गुरुजी आदींवर कठोर शब्दामध्ये टीका केली. या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे, सचिव नरेश क्षीरसागर उपस्थित होते.

वानखेडे म्हणाले, ""गांधींची हत्या केली त्यांनी गांधी हत्येची खोटी कारणे सांगितली. मध्यंतरी महात्मा गांधींच्या फोटोला एक साध्वी गोळ्या झाडत होती. महात्मा गांधींच्या विचारांची हत्या अद्याप कोणीही करू शकले नाही. त्यांचे विचार अजून जिवंतच आहेत. जगातील कुठलेही पाठ्यपुस्तक नाही, ज्यामध्ये महात्मा गांधींबद्दल धडा नाही. कुठलेही असे विद्यापीठ नाही, जे महात्मा गांधींबद्दल विद्यार्थ्यांना धडे देत नाही. गांधींना मारणे शक्‍य नाही. नथुराम गोडसे विनाकारण फासावर गेला. मला नथुराम गोडसेची दया येते.''

ते पुढे म्हणाले, ""1920 सालापूर्वी स्वातंत्र्य मागणारे पुरोगामी महात्मा गांधी देशात परत आल्यानंतर राजकीय स्वातंत्र्य मागायला लागले. त्या विशिष्ट व्यक्ती स्वातंत्र्याला एका चौकटीत बांधू पाहत होते आणि गांधी या सीमारेषा स्पष्ट करू पाहत होते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्यावर प्रथम 1934 साली हल्ला झाला होता. त्यांना गांधींबद्दल खूप द्वेष आणि तिरस्कार होता. ज्या कारणांसाठी गांधी लढत होते, त्यांचा प्रतिवाद त्यांना करता आला नाही. आज 147 देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे आहेत.''

डॉ. शरद निंबाळकर म्हणाले, ""प्रत्येकाच्या हृदयात महात्मा गांधींची धडकन सुरू आहे. त्यामुळे गांधी आणि गांधींचे विचार मरू शकणार नाही. गांधी हा मल्लखांब राष्ट्रसंतांनीसुद्धा वापरला आहे. जातिभेद, वर्णभेद जोवर मरणार नाहीत, तोवर गांधी मरणार नाही.'' संचालन संस्थेचे उपाध्यक्ष राजीव जगताप यांनी केले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahatma Gandhi's name is the strongest reason