रूळ झाले अडथळेमुक्त, रेल्वे धावणार सुसाट

योगेश बरवड
Thursday, 5 November 2020

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे एकट्या ऑक्टोबर महिन्यात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत सुमारे ८०० किमी ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीची कामे आटोपून घेण्यात आली. रूळ अडथळेमुक्त झाल्याने रेल्वेगाड्या अपेक्षित वेगात चालविणे शक्य होणार आहे.

नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे नियमित प्रवासी वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. पार्सल व मालगाड्यांव्यतिरिक्त केवळ मोजक्याच विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जात आहेत. गाड्यांची संख्या कमी असल्याने मिळणाऱ्या वेळेचा वापर रुळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी केला जातो आहे. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे एकट्या ऑक्टोबर महिन्यात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत सुमारे ८०० किमी ट्रॅकच्या देखभाल दुरुस्तीची कामे आटोपून घेण्यात आली. रूळ अडथळेमुक्त झाल्याने रेल्वेगाड्या अपेक्षित वेगात चालविणे शक्य होणार आहे.

ठळक बातमी - धमक्या मिळतात, पण मी जीवाला भीत नाही; शेवटपर्यंत ओबीसींसाठीच लढणार - वडेट्टीवार 
 

ऑक्टोबर महिन्यात रेल्वे वाहतूक नियंत्रित करीत रूळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी एकूण १ हजार ९४२ तासांचा अवधी उपलब्ध करून देण्यात आला. या काळात विविध यंत्रांचा उपयोग करीत १८३ किमी मार्गाचे टॅम्पिंग करण्यात आले. रेल्वे क्रॉसिंग असणाऱ्या ठिकाणी विशेष यंत्राच्या मदतीने देखभाल दुरुस्ती करण्यात आली. 

बीआरएम यंत्राच्या मदतीने गिट्टी टाकून ३७ किमी मार्गाखाली भराव टाकण्यात आला. ५९ किमी मार्गाचे स्थिरीकरण करण्यात आले. २३ रेल्वे फाटकांच्या ठिकाणी देखभाल दुरुस्ती करण्यात आली. याशिवाय रेल्वे परिसर व रुळांलगतच्या जागेत ४५ हजार रोपांची लागवड करण्यात आली. रुळालगत पडून असणारे विनाउपयोगाचे दगड, स्लीपरचे भाग जागेवरून हटविण्यात आले. 

८ किलोमीटर नवे ट्रॅक तयार करण्यात आले. तब्बल १७ हजार ४८० किमी घनमीटर गिट्टी ट्रॅकवर टाकण्यात आली. याशिवाय गरजेच्या ५६३ ठिकाणी रुळाला वेल्डिंग करण्यात आले. ५९८ किमी मार्गाचे यांत्रिक परीक्षण करण्यात आले. या बळकटीकरणाच्या कामांमुळे कामामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षितरीत्या आणि वेगात करणे शक्य झाले आहे. 

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maintenance and repair of tracks by Nagpur Division of Central Railway