आपल्या कल्पकतेचा ठसा जगभर उमटवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

अरविंद कुमार म्हणाले, दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ला आणि आपल्या अवतीभवतीच्या वातावरणासह देशाला समृद्ध करता येते. विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि परिश्रमाने मिळविलेल्या तांत्रिक कौशल्याचा वापर समाजाच्या विकासासाठी करावा. डॉ. डी. व्ही. जाधव म्हणाले, कुठलेही सरकार शंभर टक्के रोजगार देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण उद्योगांवर भर द्यायला हवे, असे सांगितले.

नागपूर : विश्व आता बंधनात बांधील नाही. तांत्रिक बुद्धिमत्ता आली आहे. मोठमोठ्या उद्योगांमध्ये मनुष्यबळासह स्वयंचलित यंत्रांचा वापर वाढत आहे. अशात विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना जगापुढे आणून स्वत:च्या कल्पकतेचा ठसा उमटवावा, असे आवाहन टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या नागपूर केंद्राचे प्रमुख अरविंद कुमार यांनी केले.

अवश्य वाचा - जॉनी लिव्हर म्हणतात, नागपुरचे लोकं लय भारी!

शासकीय तंत्रनिकेतनच्या 22 व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी तंत्रशिक्षण नियामक मंडळ व सहसंचालकचे अध्यक्ष डॉ. डी. व्ही जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. राम निबुदे, शासकीय तंत्र निकेतनचे प्रभारी प्राचार्य व नियामक मंडळाचे सचिव प्रा. दीपक कुळकर्णी यांच्यासह तंत्रशिक्षण मंडळाचे अधिकारी व प्रतिनिधी, विभागप्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. अरविंद कुमार म्हणाले, दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ला आणि आपल्या अवतीभवतीच्या वातावरणासह देशाला समृद्ध करता येते. विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि परिश्रमाने मिळविलेल्या तांत्रिक कौशल्याचा वापर समाजाच्या विकासासाठी करावा. डॉ. डी. व्ही. जाधव म्हणाले, कुठलेही सरकार शंभर टक्के रोजगार देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण उद्योगांवर भर द्यायला हवे, असे सांगितले. यावेळी प्रतीक वानखेडे याला सर्वाधिक सात पदके, विदिनी जलतारे आणि मोनिका ढोलवानी यांना प्रत्येकी चार पदकाने सन्मानित करण्यात आले.

प्रशासकीय सेवेत जाणार : प्रतीक वानखेडे

वडील प्रदीप वानखेडे स्वत: कंत्राटदार असल्याने मलाही आपसूक सिव्हिल अभियांत्रिकी शिक्षणची गोडी निर्माण झाली. तिन्ही वर्ष अभ्यास करताना कोणताही वेळापत्रक तयार केले नाही. फक्त जेवढा अभ्यास करायचा तो मन लावून केला. आज मला मिळालेल्या यशाचा समाजासाठी उपयोग व्हावा ही मनस्वी इच्छा असून मोठे होऊन देशाच्या विकासात हातभार लावायचा असल्याने प्रशासकीय सेवेत जाणार असल्याचे प्रतीक वानखेडेने सांगितले. सध्या प्रतीक मुंबईतील महाविद्यालयात अभियांत्रिकी द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे.
 

नियमित वर्ग करण्यामुळे यश : विदिनी जलतारे

तिन्ही वर्ष नियमित अभ्यास केला. मात्र, यासोबत नियमित वर्गही केले. यामुळे वर्गामध्ये शिक्षक जे शिकवायचे त्यामुळे अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होत होत्या. यामुळे प्रत्येक परीक्षेत चांगले गुण मिळवता आल्याचे चार पदके मिळविणाऱ्या विदिनी जलतारे हिने सांगितले. विदिनीनेही भविष्यात प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला.

कसून मेहनत केली : मोनिका ढोलवानी

संगणक विज्ञान विषयात प्रथम यायचा मी निर्धार केला होता. तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षाला ते जमले नाही. दुसऱ्या सत्रातही कमी गुण मिळाले. मात्र, तिसऱ्या सत्रापासून कसून मेहनत केली. ध्येय निश्‍चित केले आणि यश गवसता आले असे चार पदके मिळविणाऱ्या मोनिका ढोलवानी हिने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make a mark of your imagination around the world