भरझोपेत होता काका, अर्ध्यारात्री घरात शिरला पुतण्या अन् सर्वच संपल; पाचपावलीतील थरार

अनिल कांबळे
Saturday, 23 January 2021

आरोपी सारंग हातमजुरीचे काम करतो. प्राप्त माहितीनुसार, चिकनच्या दुकानात कामाला असणारा अशोकला दारूचे जबर व्यसन होते. त्याच्या त्रासाला कंटाळून सुमारे दोन वर्षांपूर्वी पत्नी सोडून गेली होती.

नागपूर : बांधकामावरून उद्‍भवलेल्या वादातून पुतण्याने लाकडी दांडक्याने डोक्यावर फटके हाणून काकाचा खून केला. शुक्रवारी सकाळी पाचपावलीतील पंचशील वाचनालयाजवळ ही थरारक घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली आहे. 

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

अशोक श्रीपतराव मेश्राम (४०), असे मृताचे, तर सारंग युवराज मेश्राम (३३) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. पंचशील वाचनालयाजवळील एकाच भूखंडावरील एकमेकांना लागून असलेल्या घरात मेश्राम कुटुंब वास्तव्यास आहे. आरोपी सारंग हातमजुरीचे काम करतो. प्राप्त माहितीनुसार, चिकनच्या दुकानात कामाला असणारा अशोकला दारूचे जबर व्यसन होते. त्याच्या त्रासाला कंटाळून सुमारे दोन वर्षांपूर्वी पत्नी सोडून गेली होती. तेव्हापासून अशोक एकटाच राहतो. अशोकने घराचे बांधकाम काढले होते. पण, जागेच्या वापरावरून अशोक व सारंगचा गुरुवारी वाद झाला. सारंगने बांधकाम थांबविण्यास भाग पाडले. या वादामुळे सारंग चांगलाच संतापला होता. पूर्वी अशोक काहीसा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता.

हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...

बऱ्याच काळापूर्वी त्याने आपला भाऊ आणि सारंगचे वडील युवराज यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला होता. सारंगलाही त्याने पाहून घेण्याची धमकी दिली होती. अशोक आपल्यावरही हल्ला करील या भीतीने त्याच्या मनात घर केले होते. यातून त्याने काकाचा गेम करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दिवसभर तो संधीच्या शोधात होता. पण, अशोक एकटा सापडला नाही. रात्री अशोक दारूच्या नशेतच घरी आला. जेवणानंतर झोपी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास सारंग हाती लाकडी दांडा घेऊन काकाच्या घरात शिरला. झोपेत असलेल्या काकाच्या डोक्यावर दांड्याने फटके हाणले. त्याची हालचाल थांबल्यानंतर सारंग निघून गेला. शुक्रवारी सकाळी खुनाची घटना उघडकीस आली. जलदगतीने तपासचक्र फिरवीत पोलिसांनी सारंगला अटक केली. भीतीपोटी काकाचा खून केल्याची कबुली त्याने दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man killed his uncle in nagpur crime news