भरधाव वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार

नितीन कुरई
Friday, 16 October 2020

 

बुटीबोरी (जि. नागपूर) : धाब्यावर काम मागायला आलेल्या इसमाला काम न मिळाल्याने रस्ता ओलांडून परत जात होता. त्याच मार्गावरून भरधाव जाणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने इसम जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बुटीबोरी पोलिस हदीत घडली. राजेश गणेशप्रसाद तिवारी (वय ५०, रा. नरखेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजेश हे राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वरील जंगेश्वर नजीकच्या अमृत धाब्यावर काही दिवसांपूर्वी कामाला होते. लॉकडाउन काळात सर्व व्यवसाय बंद झाल्यामुळे ते काम सोडून गेले होते. स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर गावाकडे काम नसल्याने आणि त्याची या धाब्यावर जुनी ओळख असल्यामुळे त्याला परत काम मिळेल, या आशेने येऊन त्याने कामासाठी विचारपूस केली. परंतु, सध्या काही काम नाही, काम वाढल्यास आम्ही तुम्हाला परत बोलावू, असे सांगून धाबा मालकाने त्याला तूर्तास मनाई केली. त्यामुळे ते परत निघाले.

ठळक बातमी - पुन्हा पाऊस येणार, सर्तकतेचा इशारा; कर्मचाऱ्यांनो मुख्यालयीच रहा

रस्ता ओलांडत असताना हैदराबाद नागपूर मार्गाने भरधाव येत असलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी ठाण्याचे एपीआय माणिक चौधरी, वाहतूक विभागाचे मयूर ढेकले, रवी बावणे, अभिषेक भैसे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देऊन मृतदेह ताब्यात घेतला.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man killed in road accident at Nagpur