कोरोना, तू लवकर जा रे बाबा... तुझ्यामुळे आम्हाला आंबे खायला मिळत नाहीये...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

गुढीपाडवा झाला की सर्वांनाच द्राक्षे, टरबुज आणि आंबे अशा फळांची आठवण येते. सर्वांनाच घरबसल्या आंब्याची चव चाखण्याची इच्छा होत आहे. पण लॉकडाऊनच्या बडग्यामुळे नागरिकांना आंबा खरेदी करता येत नसल्याने आंब्याचा गोडवा हरवला आहे.

नागपूर : कोरोना विषाणुचा प्रसार वाढत चालल्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्वच बाजारपेठेवर झाला आहे. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने विविध प्रकारच्या आंब्याचे आगमन बाजारपेठेत झाले. सर्वांनाच घरबसल्या आंब्याची चव चाखण्याची इच्छा होत आहे. पण लॉकडाऊनच्या बडग्यामुळे नागरिकांना आंबा खरेदी करता येत नसल्याने आंब्याचा गोडवा हरवला आहे.

 

गुढीपाडवा झाला की सर्वांनाच द्राक्षे, टरबुज आणि आंबे अशा फळांची आठवण येते. गुढी पाडव्यानंतर बाजारपेठेत आंब्याची आवक सुरू होते. रत्नागिरी हापुस, सिंधुदुर्ग, देवगड असा कोकणातला राजा म्हणून ओळखल्या जाणा-या हापुस आंब्याचे जोरदार आगमन झाले होते. काही दिवसातच कोरोना विषाणुचा फैलाव देशामध्ये सुरू झाला. त्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम झाला आहे.

 

भाजीपाल्यासह फळ मार्केटला देखील कोरोनाचा फटका बसला आहे. उपराजधानीत फळ मार्केटमध्ये विविध ठिकाणाहून फळांची आवक होते. विविध भागात आणि परिसरातील गावांमध्ये फळांची विक्री होते. पण कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने फळांची खरेदी कोण करणार असा मुद्दा निर्माण झाला आहे. सध्या बाजारपेठेत काही किरकोळ व्यापारी फळांची खरेदी करून हातगाडीच्या माध्यमातून विक्री करीत आहेत. सध्या वाहतूक बंद असल्याने परराज्यातून येणाऱ्या फळांची आवक कमी झाली आहे.

मागणीनुसार फळांचा दर

सध्या फळ बाजारपेठेत हापुस आंब्याचा दर 800 रुपये डझनपासून 400 रुपयेपर्यंत आहे. तसेच लहान आणि मोठ्या आकाराच्या आंब्याचा दर मागणीनुसार आहे. तसेच संत्री, सफरचंद, द्राक्षे आदी फळांची आवक घटली आहे. शीतगृहात असलेला साठा विक्रीसाठी काढण्यात येत आहे. त्यामुळे सफरचंदचा दर 150 रुपये प्रतिकिलो आहे. द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने आवक घटली आहे. तरी देखील फळ बाजारपेठेत 50 ते 80 रुपये किलो दराने द्राक्षाची विक्री होत आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, मागणीदेखील वाढत आहे.

असं घडलंच कसं? : भयंकर! आणखी चार रुग्णांची भर; एकूण कोरोना पॉझिटिव्ह 63

फळ उत्पादकांना कोरोनाचा फटका

आंब्याचा गोडवा चाखण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत आहे. पण बाजारपेठ बंद असल्याने आणि संचारबंदी असल्याने नागरिकांना आंबे मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे आंब्याचा गोडवा हरवला आहे. सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक असली तरी उचल म्हणावी तशी होत नाही. त्यामुळे फळ विक्रेत्यांसह बागायतदार, फळ उत्पादकांना कोरोनाचा फटका बसला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी सोसावी लागत आहे. फळे घेण्यासाठी नागरिकांना जादाचे पैसे देखील मोजावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असलेल्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangos are unavailable in summer due to corona