बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी मानकापूर पोलिस सूत्रधारांच्या शोधात 

नरेंद्र चोरे
Sunday, 1 November 2020

बनावट प्रमाणपत्र प्रकरणातील रॅकेटचा मुख्य सूत्रधार औरंगाबादचा अंकुश राठोड व भाऊसाहेब बांगर यांना गेल्या आठवड्यात बेड्या ठोकल्यानंतर पतंगे व कल्याण मुरकुटे (रा. गंगाखेड) या आणखी दोन फरार सुत्रधारांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यासाठी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या नेतृत्वात मानकापूर पोलिसांचे पथक औरंगाबादलाही जाऊन आले. मात्र त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले नाही.

नागपूर  : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या हिंगोलीच्या शंकर पतंगेसह चार जणांचा मानकापूर पाेलिस सध्या शोध घेत आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस जागोजागी छापे टाकत आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप यश आले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट प्रमाणपत्र प्रकरणातील रॅकेटचा मुख्य सूत्रधार औरंगाबादचा अंकुश राठोड व भाऊसाहेब बांगर यांना गेल्या आठवड्यात बेड्या ठोकल्यानंतर पतंगे व कल्याण मुरकुटे (रा. गंगाखेड) या आणखी दोन फरार सुत्रधारांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यासाठी तपास अधिकारी पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या नेतृत्वात मानकापूर पोलिसांचे पथक औरंगाबादलाही जाऊन आले. मात्र त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले नाही. सुगावा लागताच दोघेही फरार झाले. पाटबंधारे विभागात नोकरीवर असलेल्या पतंगेने बनावट प्रमाणपत्र प्रकरणात मोठी माया जमावल्याची माहिती आहे. औरंगाबादमध्ये त्याचे तीन मजली घर असून, मुरकुटेनेही बरीच कमाई केलेली आहे. 

 

हेही वाचा : *माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र !*
 

याशिवाय राठोडचा अन्य एक साथीदार पांडुरंग बारगजे, विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचा सचिव डॉ. श्रीकांत वरणकर आणि सांगलीच्या एका शाळेत शिक्षक असलेला मूळ बीडचा दलाल कृष्णा बाबूराव जायभाळे यांचाही पोलिस शोध घेत आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून हे तिघेही फरार आहेत. या प्रकरणात क्रीडा संघटनांचे इतरही बडे पदाधिकारी सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. या सर्वांकडे महत्त्वाची माहिती असल्याने त्यांना अटक होणे गरजेचे असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

 

हेही वाचा : *आईने टाकलेल्या बाळासाठी मंगेशी झाली माई; उमेद संकल्प संस्थेने घेतले दत्तक*
 

संपूर्ण राज्यात पसरलेल्या या घोटाळ्यात आतापर्यंत विविध ठिकाणी सहा क्रीडा अधिकारी, लाभार्थी व टोळीतील म्होरक्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यात माजी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, क्रीडा अधिकारी महेश पडोळे, अंकुश राठोड, भाऊसाहेब बांगर आणि रवींद्र व संजय या सांगलीच्या सावंत बंधूंचा समावेश आहे. यातील चौघे जण सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर राठोड व बांगर हे पोलिस कोठडीत आहेत. न्यायालयाने कालच त्यांच्या पोलिस कोठडीत तीन नोव्हेंबरपर्यंत वाढ केलेली आहे. हे सर्व जण संगनमताने बोगस प्रमाणपत्र विक्री करून मलिदा लाटत होते. लाखो रुपयांत विई कत घेतलेल्या या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारावर अनेक बनावट खेळाडूंनी विविध विभागांमध्ये शासकीय नाेकऱ्या मिळविल्या आहेत. दैनिक 'सकाळ'ने हे गंभीर प्रकरण उचलून धरले आहे.  

 संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mankapur Police in search of facilitators in Fake Sports Certificate Case