कोरोना काळात मनपाकडून मनुष्यबळाचाच अपव्यव!

राजेश प्रायकर
Wednesday, 7 October 2020

पालिकेच्या स्थायी समिती, परिवहनसह विविध तेरा समित्या आहेत. या तेरा समित्यांचे कक्ष असून येथे किमान दोन शिपाई आहेत. याशिवाय प्रत्येक कक्षासाठी तीन ते चार सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा काळ असल्याने पालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांशिवाय कुणीही पदाधिकारी महापालिकेकडे फिरकत नाही.

नागपूर : एकीकडे महापालिकेने तयार केलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये कर्मचारी नसल्याने कोरोनाबाधितांना सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेची कसरत होत आहे. त्याचवेळी महापालिकेतील प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या कक्षात तीन ते चार सफाई कर्मचारी खितपत पडले आहेत. या कर्मचाऱ्यांचा उपयोग कोविड हॉस्पिटल किंवा इतर कोरोना संबंधित कामांसाठी करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाकडून मनुष्यबळाचाच अपव्यय सुरू असल्याचे चित्र आहे.

पालिकेच्या स्थायी समिती, परिवहनसह विविध तेरा समित्या आहेत. या तेरा समित्यांचे कक्ष असून येथे किमान दोन शिपाई आहेत. याशिवाय प्रत्येक कक्षासाठी तीन ते चार सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा काळ असल्याने पालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षांशिवाय कुणीही पदाधिकारी महापालिकेकडे फिरकत नाही.

या सर्वांच्या कक्षात शिपाई असताना तीन ते चार सफाई कर्मचारी स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात आले आहे. पदाधिकारी कक्षात येत नाही नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांनाही कुठलेही काम नसते. त्यामुळे दिवसभर हे सफाई कर्मचारी वेळ कसा घालवावा? याचा विचार करीत असतात. दुसरीकडे पालिकेकडे मनुष्यबळ नसल्याने कोविड रुग्णालयेच काही विश्वस्त संस्था तसेच रेल्वेसारख्या संस्थेला चालविण्यास देण्यात येत आहे.

कोरोना काळात पदाधिकाऱ्यांच्या कक्षातील सफाई कर्मचाऱ्यांची मदत कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरमध्ये घेणे शक्य आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. जवळपास चाळीस सफाई कर्मचारी कुठलेही काम नसल्याने पदाधिकाऱ्यांच्या कक्षात पडलेले आढळतात.

मध्यप्रदेशात काँग्रेसचा केदार यांच्या रणनीतीवर भरवसा

किमान कोविड केअर सेंटर तसेच हॉस्पिटलमध्ये या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या कामाशिवाय उच्च शिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांना बाधितांची सेवा करण्याबाबत प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडूनही कामे करून घेतली जाऊ शकते, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने नमूद केले. परंतु याकडे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या चाळीस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर लाखो रुपये खर्च केले जात आहे.

पदाधिकाऱ्यांचे मौन
कोरोना संदर्भात उपाययोजना केवळ प्रशासनाचे काम नाही तर पदाधिकाऱ्यांचीही जबाबदारी आहे. परंतु पदाधिकारी कक्षात खितपत पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांबाबत मौन बाळगून आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात पदाधिकाऱ्यांच्या गांभीर्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manpower wasted by NMC during Corona period!