42 देशांतील मराठी बांधव करणार कोरोना महाजागर...सहभागासाठी संकेतस्थळाला द्या भेट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

हा जागृती संदेश एकाच दिवशी लाखो लोक शेअर करतील आणि त्यापुढील 72 तासांत तो जगभर मोठ्या प्रमाणावर पाठवला जाईल. किमान एक कोटी मराठी भाषकांनी या महाजागरमध्ये सहभागी व्हावे, या पद्धतीने जगभरातील विश्‍व मराठी परिषदेचे समन्वयक प्रयत्न करीत आहेत. 

नागपूर : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर जगभरातील मराठी बांधव उद्या (ता. 25)पासून कोरोनासंबंधी महाजागर करणार आहेत. विश्‍व मराठी परिषदेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोरोनाविषयी मानसिक, भावनिक, आरोग्य आणि शैक्षणिक जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध प्रकारचे संदेश तयार करीत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड आणि शेअर करतील. 

यामध्ये 42 देशातून, अमेरिकेतील 21 राज्यांतून आणि महाराष्ट्रासह भारतातील 12 राज्यांतून एकाच वेळी मराठी भाषक एकत्र येत आहेत. या अभिनव उपक्रमाचे नेतृत्व बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या अध्यक्ष विद्या जोशी करणार आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशन 2021 शार्लेट (अमेरिका)चे मुख्य संयोजक आणि गर्जा मराठीचे संस्थापक सदस्य संदीप पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील आणि विविध देशांतील महाराष्ट्र मंडळांचे आजी-माजी पदाधिकारी या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत. हा जागृती संदेश एकाच दिवशी लाखो लोक शेअर करतील आणि त्यापुढील 72 तासांत तो जगभर मोठ्या प्रमाणावर पाठवला जाईल. किमान एक कोटी मराठी भाषकांनी या महाजागरमध्ये सहभागी व्हावे, या पद्धतीने जगभरातील विश्‍व मराठी परिषदेचे समन्वयक प्रयत्न करीत आहेत. 

जगजगभरातील महाराष्ट्र मंडळे, सांस्कृतिक मंडळे, मराठी संस्था, मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन संस्था, मराठी कट्टे आदी या उपक्रमात सहभागी होत आहेत. अमेरिकेतील आर्सी फाउंडेशन यासाठी विशेष साहाय्य करीत आहे. या महाजागरमध्ये सहभागी होण्यासाठी www.vishwamarathiparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. यू-ट्यूबवर #Covid19Jagar असे सर्च करून हा व्हिडिओ पाहता येईल. मराठी भाषकांनी या महाजागरमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विश्‍व मराठी परिषदेच्या वतीने प्रा. क्षितिज पाटुकले आणि अनिल कुलकर्णी यांनी केले आहे. 

हेही वाचा : तलफ भागविण्यासाठी युवकांना लागली या सोलुशनची चटक...वाचा सविस्तर 

 

हा उपक्रम म्हणजे मराठी भाषकांचे ऐक्‍य, बंधुभाव आणि संवाद यांचा अभूतपूर्व आविष्कार असेल. उपक्रमाद्वारे कोरोना आजाराच्या काळातील जगभरातील मराठी बांधवांच्या संवादाचे एक महत्त्वपूर्ण असे दस्तऐवजीकरणही होईल. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य, जागृती, दस्तऐवजीकरण, सर्जनशील कल्पनांचा आविष्कार आणि विश्‍वसंवाद असे या उपक्रमाचे अपेक्षित फलित आहे. 
-डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मार्गदर्शक, विश्‍व मराठी परिषद  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi people will do Corona Mahajagar