तलफ भागविण्यासाठी युवकांना लागली या सोलुशनची चटक...वाचा सविस्तर 

सुरेश नगराळे
रविवार, 24 मे 2020

बोनफिक्‍सचे सेवन किंवा वास घेतल्याने शरीराचा थकवा दूर होतो. एकटे राहण्याची इच्छा होते. नशेमुळे रंगीबेरंगी चित्रे दिसायला लागतात, असा युवकांमध्ये समज आहे. एकूणच नशेचा आनंद मिळत असल्याने या सोलुशनचा वापरही वाढल्याचे दिसून येत आहे. 

गडचिरोली : लॉकडाउनमुळे दारू, खर्रा तसेच अन्य नशेचे पदार्थ मिळण्यासाठी अडचणी जात असल्याने तरुण नको त्या घातक केमिकलचा वापर मौजमजेसाठी करीत आहेत. परंतु, तज्ज्ञांच्या मते हा प्रकार त्यांच्या अंगलट येऊ शकतो. गडचिरोली शहरात सध्या सायकल ट्यूब, प्लॅस्टिक पाइप चिपकविण्यासाठी वापरात येणाऱ्या "बोनफिक्‍स' नावाचे सोल्यूशन चांगलेच चर्चेत आले आहे. याचा नशेसाठी वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

शहरात काही दिवसांपासून युवकांना एका वेगळ्या प्रकारच्या नशेची सवय लागली आहे. ही नशा दारू, गांजा व हेरॉइनपेक्षाही धोकादायक आहे. सर्वत्र मिळणारे "बोनफिक्‍स' प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून त्याचा वास घेऊन किंवा कोल्ड्रिंक्‍समध्ये टाकून नशेसाठी वापर केला जात आहे. 15 ते 20 वयोगटातील युवकांना या नशेची सवय लागली असून, लॉकडाउनच्या काळात शेकडो युवक याच्या आहारी गेले आहेत. 

हेही वाचा : लॉकडाउनमध्ये शाकाल लूकला पसंती...डोक्‍याचा केला चमनगोटा 

भविष्यात त्यांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. 
बोनफिक्‍सचे सेवन किंवा वास घेतल्याने शरीराचा थकवा दूर होतो. एकटे राहण्याची इच्छा होते. नशेमुळे रंगीबेरंगी चित्रे दिसायला लागतात, असा युवकांमध्ये समज आहे. एकूणच नशेचा आनंद मिळत असल्याने या सोलुशनचा वापरही वाढल्याचे दिसून येत आहे. 
गडचिरोली शहरात चांदाळा रोड, गुरवडा मार्ग तसेच जिल्हा प्रेक्षागार मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत दररोज मोठ्या प्रमाणात बोनफिक्‍सचे रिकामे खोके आढळून येत असल्याने नागरिकांचा चर्चेचा विषय बनला आहे. रात्रीच्या सुमारास तरुणांचे टोळके वेगवेगळ्या ठिकाणी बसून 
या सोलुशनची सामूहिक नशा करीत आहेत. 

 
बोनफिक्‍स हे एक ज्वलनशील पदार्थ असून, त्याचा वापर ट्यूब तसेच प्लॅस्टिक पाइप चिपकवण्यासाठी केला जातो. या सोलुशनचा वापर 
नशा म्हणून केल्यास ते आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास मनुष्याच्या मानसिक विकासावर परिणाम होतो. याशिवाय तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्‍यता अधिक आहे. सततच्या सेवनामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो. 
-प्रा. डॉ. सतीश कोला, 
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth are addicted to solution