
कुही, भिवापुर उमरेड मौदा हे मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. मध्यंतरी गेल्या आठ ते दहा वर्षात मिरचीची आवक कमी झाली होती. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना आणि मिरची प्रक्रिया उत्पादकांना बाहेरून मिरची मागवावी लागत होती
वेलतूर (जि. नागपूर) ः लाल पिकलेल्या ओल्या आणि वाळल्या मिरचीचा व्यवसाय परीसरात संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हिरव्या कच्च्या मिरचीची दुप्पट खरेदी विक्री येथे झाली, मात्र ओल्या लाल मिरचीची बाजारात अजूनही प्रतीक्षाच आहे. आतापर्यंत दोन लाख ५५ हजार क्विंटलवर मौदा बाजारात हिरव्या मिरचीची खरेदी विक्री झाल्याचे कळते. मांढळ बाजारात ती २५ हजार क्विंटल आहे. हंगाम संपेपर्यंत तीन लाख क्विंटलपर्यंत आकडा जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे व मंदीमुळे भावदेखील समाधानकारक दिला जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही नाराजी आहे.
कुही, भिवापुर उमरेड मौदा हे मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. मध्यंतरी गेल्या आठ ते दहा वर्षात मिरचीची आवक कमी झाली होती. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना आणि मिरची प्रक्रिया उत्पादकांना बाहेरून मिरची मागवावी लागत होती. परंतु यंदा मिरचीचे क्षेत्र दुपटीने वाढल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणावर झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीने मिरचीची आवक झाली आहे.
हेही वाचा - कॉंग्रेसच्या अधिवेशनापासून अधिक तीव्र झाली होती स्वातंत्र्य चळवळ; नागपूर अधिवेशनाला...
गेल्या वर्षी एक ते सव्वा लाख क्विंटल मिरचीची आवक झाली होती. यंदा हंगाम संपण्याअगोदरच तब्बल अडीच लाखापेक्षा अधिक आवक झाली आहे. आणखी दोन ते तीन आठवड्यात ४० ते ४५ हजार क्विंटल आवक गृहीत धरली तर यंदा तीन लाख क्विंटल आवक होण्याची अपेक्षा आहे. ही आवक गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक राहणार आहे. सध्या दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल आवक सुरू आहे. हंगामाच्या सुरुवातीला हीच आवक चार ते पाच हजार क्विंटलपर्यंत जात होती. हंगामाच्या शेवटपर्यंत ती दैनंदिन दीड हजार क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
यंदा मिरचीचे भाव दोलायमान राहिले. सुरुवातीला मिरचीच्या प्रतवारीनुसार १२०० ते १९०० रुपये क्विंटलपर्यंत होते. त्यानंतर त्यात वाढ होऊन २२०० रुपयांपर्यंत गेले. सध्यादेखील १४०० ते २२०० रुपये क्विंटल दरम्यान भाव दिला जात आहे. व्यापारी घटले. सुरुवातीला मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या १५ पेक्षा अधिक होती. परंतु यंदा मिरचीची आवक व त्यानुसार झालेली खरेदी लक्षात घेता काही व्यापारी कमी झाले. त्यामुळे आताच्या स्थितीत केवळ सात ते आठच व्यापारी खरेदीदार आहेत. त्यामुळे मिरचीच्या उलाढालीवर देखील परिणाम झाला आहे.
नक्की वाचा - "साहब, वो झोपडीमे नही आते, उनकी फोटो लगाके...
यंदा मिरची उलाढालीत मंदीचे सावट कायम राहिले. हंगामाच्या सुरुवातीलाच कोरोनामुळे खरेदी काही दिवस बंद होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातच मिरची वाळवावी लागली. त्यानंतर खरेदी-विक्रीला सुरुवात झाली असली तरी मंदीचे सावट कायम होते. शेतकऱ्यांना पेमेंट चेकद्वारे दिले जात होते. चेक बँकामध्ये दोन ते तीन आठवडे वटतच नव्हते. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. लाल मिरची नसल्याने मिरची सातरे बंद पडले आहेत. ह्यातून मिळत असलेला हंगामी रोजगार बुडाला असल्याने सातरया वर काम करणारे कामगार हवालदिल झाले आहेत.
संपादन - अथर्व महांकाळ