गर्भातील लेकरांसाठी 'त्या' लढल्या कोरोनाशी, वाचा कोव्हिड योध्दयांची गाथा

केवल जीवनतारे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आपल्यासोबत आणखी एक जीव वाढत असल्याने कोरोनाच्या भयंकर वातावरणात स्वत:ची जास्त काळजी घ्यावी लागते. तशीच गर्भातील जीवाची काळजी घ्यावी लागते.

नागपूर : मध्यप्रदेशातील मुलताई येथील 9 महिन्यांची गर्भवती. अवघं 20 वर्षांच वय. प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. 200 किलोमीटर अंतर कापून नागपूरच्या मेयोत रुग्णालयात आणले. मात्र तिला मातेला मिरगीचा झटका आला. नातेवाईकांनी तिला मिरगीच्या आजारावरील औषधाचा डोस दिला. डोस जास्त झाला. ती माता कोमात गेली. मेयोतील डॉक्‍टरांनी गर्भातील बाळाच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून व्हेंटिलेटवर असलेल्या कोमातील मातेचे सिझेरियन केले. मेयोतील प्रसूती विभागातील डॉक्‍टरांनी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून कोमातील त्या मातेची प्रसूती केली.

एका गोंडस बाळाचा जन्म झाला. बाळाला जीवदान मिळाले, मात्र बाळाच्या जन्मानंतर काही वेळात त्या दुर्दैवी मातेचा मृत्यू झाला. या पाश्वभूमीवर माहिती घेतली असता, मेयो आणि मेडिकलमधील डॉक्टरांनी लॉकडाऊनच्या काळात ६४ गर्भवती मातांची प्रसूती केली. कुटुंबातील एखाद्याला कोरोना झाल्यामुळे त्याला अस्पृश्यासारखी वागणूक दिली जात असताना  मेयो-मेडिकलमधील डॉक्टरांनी जीवावर उदार होऊन या मातांची यशस्वी प्रसूती केली. त्या डॉक्टरांना सलाम तर  गर्भातील लेकरांसाठी कोरोनाशी लढणाऱ्या त्या मातांच्या जिद्दीलाही सलाम करावा लागणार आहे.

त्यांच्या बोनस आयुष्याला कशाची आहे प्रतीक्षा...वाचा - 

कोरोनासारख्या गंभीर आजारावर मात करताना गर्भवती असलेल्या मातांना खूप मोठा संघर्ष करावा लागतो आहे. मात्र लेकरांच्या जिवासाठी गर्भवतींनी कोरोनाशी दोन हात केले. विशेष असे की, कोरोनाबाधित मातांनी बाळाला जन्म दिल्यानंतर ६२ पैकी ५० पेक्षा अधिक चिमुकले हे कोरोनामुक्त आहेत. मेडिकलमधील एक प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. कांचन समीर गोलावार यांनी सहा कोरोनाबाधित गर्भवती मातांची प्रसूती केली. ही तारेवरील कसरत करताना येणाऱ्या अनुभव त्यांनी मांडले. त्यांच्या भावना ह्दयाचा ठाव घेणाऱ्या होत्या.

कोरोना विळख्यात अडकलेल्या एका गर्भवती स्त्रीची मानसिक अवस्था काय आहे, हे दुस-या गर्भवती स्त्रीपेक्षा जास्त चांगलं कोणाला समजणार? आपल्यासोबत आणखी एक जीव वाढत असल्याने कोरोनाच्या भयंकर वातावरणात स्वत:ची जास्त काळजी घ्यावी लागते. तशीच गर्भातील जीवाची काळजी घ्यावी लागते. प्रसूती करताना आलेला मानसिक ताण आणि कोरोनापुढे हात टेकलेल्या या येणा-या बाळाला सुरक्षित जीवन देणं हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होतं. 

मेयोत-मेडिकलमध्ये कोरोनाबाधित मातांची प्रसूती

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो) प्रसूतीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत उईके यांच्या मार्गदर्शनात सुमारे ३९ कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती मातांची प्रसूती झाल्या आहेत. यात डॉ. लता आसुदानी, डॉ. दीप्ती कदम यांचे मोलोचे योगदान आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) प्रसुती रोग विभागप्रसमुख यांच्या मार्गदर्शनात २३ प्रसूती झाल्या आहेत. डॉ. कांचन गोलावर, डॉ. अनिल हुमणे, डॉ. रामटेके यांच्यासह अनेक डॉक्टारांचे मोलाचे योगदान आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mayo-Medical, 62 Delivery of corona mothers