esakal | आयुक्‍त तुकाराम मुंढेंवर महापौरांनी केले हे गंभीर आरोप...
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor Sandeep Joshi got angry with Commissioner Tukaram Mundhe

महापौर म्हणून दिलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. आपण ते करीत नाहीत, ही बाब वेगळी', अशी खदखद महापौरांनी या पत्रातून व्यक्त केली.

आयुक्‍त तुकाराम मुंढेंवर महापौरांनी केले हे गंभीर आरोप...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्त व सत्ताधाऱ्यांतील शीतयुद्धाचे रूपांतर वाक्‌युद्धात झाल्याचे चित्र आहे. महापौर संदीप जोशी यांनी महापौरांच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असतानाही पाळले जात नसल्याचा आरोप करीत आयुक्तांवर संताप व्यक्त केला. आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात महापौरांनी राजकारणावरूनही आयुक्तांना फैलावर घेतले.

मागील महिन्यात महापौर संदीप जोशी यांनी आमदार निवासातील विलगीकरण केंद्रातील नागरिकांच्या दुरवस्थेवरून महापालिका प्रशासनाला जाहीरपणे धारेवर धरले होते. यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लगेच पलटवार करीत महापौरांनी माहिती घेऊन बोलावे, ही राजकारण करण्याची वेळ नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावर महापौर संदीप जोशी यांनी तत्काळ अर्थात 22 एप्रिलला आयुक्तांना पत्र लिहून आक्षेप नोंदविला.

तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा तर नोंदवला, पण पुढे...

या पत्रातून जोशी यांनी आयुक्तांवर संतापच व्यक्त केला. "महापौर म्हणून दिलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. आपण ते करीत नाहीत, ही बाब वेगळी', अशी खदखद महापौरांनी या पत्रातून व्यक्त केली. "विलगीकरण केंद्रातील दुरवस्थेबाबत विरोधी पक्षनेत्यांनी जी भूमिका मांडली, तीच मीही मांडली. सत्तापक्ष व विरोधी पक्ष एकाच मुद्द्याकडे लक्ष वेधत असेल तर ती बाब गंभीरतेने घ्यायची की राजकारण म्हणून सोडून द्यायचे, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे', असा समाचारही महापौरांनी घेतला.

एवढेच नव्हे तर आयुक्तांच्या "माहिती करून बोलावे' या प्रतिक्रियेवरही महापौरांनी आयुक्तांना सडेतोड उत्तर दिले. "लोणारा विलगीकरण केंद्राबाबतचा फोटो वर्तमानपत्रांमध्ये ठळकपणे प्रकाशित झाला. अशीच परिस्थिती आमदार निवास विलगीकरण केंद्राची असू शकते. त्यामुळे विलगीकरणातील नागरिकांचा वाढता आकडा लक्षात घेता शहरात दहशत निर्माण होत असून यासाठी मनपा प्रशासन जबाबदार आहे'', असेही महापौरांनी पत्रात नमूद केले.

"लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रशासनाची दोन चाके आहेत. त्याप्रमाणे आपण वागावे', अशी भावनाही महापौरांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. आयुक्तांना मागील महिन्यात महापौरांनी पाठविलेल्या या पत्राने उभयतांमधील ताणतणावाचे संबंध चव्हाट्यावर आले.

go to top