नागपूर ब्रेकिंग : आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध महापौरांची पोलिसांत तक्रार

Mayor lodged a complaint against Commissioner
Mayor lodged a complaint against Commissioner

नागपूर : महापौर संदीप जोशी यांनी आज (ता. 22) आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्मार्ट सिटीत घोटाळा, अनियमितता केल्याचा आरोप महापौरांनी केला. गेल्या तीन दिवसांत महापालिकेच्या इतिहासातील ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. महापौर स्मार्ट सिटी कंपनीचे संचालक आहेत. शनिवारी आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी सभागृह सोडले होते.

अपमान झाल्याने सभागृहात येणारच नाही, ही भूमिका शहर विकासाला बाधक आहे. राग सोडून मंगळवारी होणाऱ्या सभेत परत यावे ही सभागृहाची भावना आहे. मनाचा मोठेपणा दाखवून सभागृहात उपस्थित राहावे, अशी विनंती करणारे पत्र महापौर संदीप जोशी यांनी रविवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठविले. सुरुवातीला महापौरांनी आयुक्‍तांची दूरध्वनीवरून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अपयशी ठरल्याने महापौरांनी रविवारी सविस्तर पत्र लिहून आयुक्तांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.

शनिवारी महापालिकेच्या सभागृहात घटनेची पायमल्ली करणारी घटना घडली. या घटनेचा उल्लेख करीत महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठविले. कालच्या घटनेवर दुःख व्यक्त करीत महापौरांनी सभागृहानेही याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे आयुक्तांना सांगितले. याशिवाय सभागृहात घडलेल्या नाट्यासाठी कारणीभूत ठरलेल्या 'पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन'च्या नियमाबाबत महापौरांनी आयुक्तांना स्पष्ट केले. मात्र, हरीश ग्वालवंशी यांनी जे काही वक्तव्य केले, त्याचे कुणीही समर्थन करीत नाही. मात्र, ते वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याचे संवैधानिक अस्त्र असताना सभागृहाचा त्याग करणे आयुक्तपद, सभागृह आणि लोकशाहीची गरिमा कलंकित करणारे आहे, अशी समजूतही महापौरांनी पत्रातून काढली.

सभागृहात परत यावे, यासाठी अतिरिक्त आयुक्तांसह मीही फोन केला. परंतु अपमान झाल्याने सभागृहात येणारच नाही, ही भूमिका शहर विकासाच्या दृष्टीने हानीकारक आहे, असेही महापौरांनी पत्रात म्हटले आहे. कोरोनाच्या काळात शहराला आयुक्त मुंढेंची गरज असल्याचे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे. लोकप्रतिनिधींसोबत संवाद ठेवून कधी त्यांचेही ऐकून घ्यावे, असे आवाहन महापौरांनी त्यांना केले. सिवेज लाईनवरील चेंबर तुटली, पावसाच्या पाण्यासह घाण पाणी घरात लोकांच्या घरात शिरत आहे, पावसाळी नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे शहरातील जनता नगरसेवकांच्या घरी जाऊन ओरडत आहे, अशी नगरसेवकांची स्थिती मांडत महापौरांनी सहा जूनला आवश्‍यक कामे तत्काळ सुरू करण्याबाबतच्या दिलेल्या आश्‍वासनाचीही आयुक्तांना आठवण करून दिली. ही कामे तत्काळ सुरू करण्याची विनंतीही आयुक्तांना पत्रातून केली होती.

शनिवारी सभागृहाबाहेर आयुक्तांचे फोटो असलेले बॅनर घेऊन त्यांच्या समर्थनात काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. याकडे पत्रातून लक्ष वेधत ही घोषणाबाजी करणाऱ्यांची समजूत काढण्याची गरज होती, घोषणाबाजी थांबविली असती तर नागपूरकरांनी आपला मोठेपणा अनुभवला असता, असा टोलाही महापौरांनी आयुक्तांना लगावला. मनपा कायद्यानुसार सभागृह हे सार्वभौम आहे. सभागृहातून आयुक्तांनी निघून जाणे हा सभागृहाचा अपमान आहे, असे महापौरांनी पत्रातून स्पष्ट केले होते. या प्रकारानंतर सोमवारी सायंकाळी महापौरांनी थेट सदर पोलिस ठाणे गाठत आयुक्‍तांविरोधात तक्रार केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com