नागपुरात 'छा गये मुंढे साब '... आधी निर्णयांचा धडाका, आता शुभेच्छांचा वर्षाव

tukaram mundhe
tukaram mundhe

नागपूर : तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदलून आल्यापासून त्यांचे आणि सत्तारूढ भाजपचे फारसे पटलेले नाही. त्यांच्यात सतत खडाजंगी होत असते. भाजपच्या मुंढे विरोधाला काँग्रेसचीही साथ मिळताना दिसते आहे. अशा स्थितीत, एकीकडे एकमेकांवरील ऑफलाईन आरोप-प्रत्यारोप आणि सवाल-जवाब रंगत असताना आणि मुंढे समर्थकांनी सोशल मीडियाच्या भिंती `तुकाराममय` केलेल्या असताना भाजपचे नेते आणि महापौर संदीप जोशी यांनी आज, ३ तारखेला तुकाराम मुंढे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि सर्वांना बुचकाळ्यात टाकले.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून नागपुरात मुंढे यांच्या लोकप्रियतेचा वाढता ज्वर सोशल मीडियावर दिसतो आहे. असंख्य लोकांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मुंढेंचा फोटो लावून `आम्ही तुमच्या सोबत आहोत`, अशी द्वाही फिरवणे सुरू केले आहे. त्यात आज त्यांचा वाढदिवस आला आणि संदीप जोशींनी त्यांना पुष्पगुच्छ दिला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. सोशल मीडियावरचे राजकीय नेते विरुद्ध तुकाराम मुंढे हे युद्ध नागपुरात सध्या जोरात रंगले आहे. मुंढे यांनी हे करावे की करू नये, हा वादाचा विषय आहे. याच पार्श्वभूमीवर आलेला त्यांचा जन्मदिन मुंढे यांच्यासाठी फायद्याचा ठरला आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा नुसता वर्षाव सुरू आहे.

आज सकाळपासूनच सोशल मीडियावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे. त्यांचे काही चाहते ही संधी साधून मुंढे किती लोकप्रिय आणि कार्यशील आहेत हे दर्शवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच संधी साधून विरोधकांना टोलेही लगावत आहेत. महापालिकेचे कर्मचारी मात्र काम सोडून अभिष्ट चिंतनासाठी आपण मुंढे साहेबांकडे गेलो तर ते आपल्यावर कारवाई करतील, या भीतीने टेबलवरच बसून आहेत. मधल्या सुटीच्या वेळेत आम्ही शुभेच्छा द्यायला जाऊ, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. 

मुंढे आणि महापौर यांच्यात सुरुवातीपासूनच मतभेद आहेत.  आयुक्त कोणाला न विचारता परस्पर निर्णय घेत असल्याचा महापौरांचा दावा आहे त्यावरून ते आणि मुंढे यांच्यात अनेकदा खटके उडाले. अलीकडेच सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन मुंढे यांच्या विरोधात पत्रकार परिषदसुद्धा घेतली. महापौर जोशी यांनी पत्र पाठवून त्यांना ठणकावलेसुध्दा होते. त्यानंतर मुंढे समर्थकांनी 'आय किंवा वी सपोर्ट मुंढे' अशी मोहीम सोशल मीडियावर जोरात सुरू केली. या सर्व घडामोडी घडत असताना महापौर संदीप जोशी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मुंढे यांना शुभेच्छा दिल्या.

या माध्यमातून त्यांनी आपला विरोध कुणा व्यक्तीला नाही तर धोरणाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, की यापुढे आयुक्तांशी जुळवून घेण्याचा महापौरांचा मानस आहे, हे भविष्यात दिसेल. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता असून, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंढे यांना आयुक्त म्हणून नागपूरला पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. तेव्हापासून नागपुरात फक्त मुंढे तेवढे चर्चेत असतात. त्यांना राजकीय पुढारी हुकूमशहा म्हणत असले तरी जनतेत त्यांना मोठे पाठबळ असल्याचे वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या शुभेच्छांच्या वर्षावातून दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com