पालकांनो, असे सांभाळा किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

पालकांनी 10 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांकडे अधिक सजगपणे पाहणे गरजेचे आहे. तसेच किशोरवयीन मुलींच्याही अनेक समस्या असतात. या समस्यांचे निराकरण झाले नाही, तर त्यांची मानसिक अवस्था बिघडते.

नागपूर :  किशोरवयीन मुले ही अधिक भावनिक असतात. कोणत्याही मोहात ती सहज अडकतात. लहानसहान गोष्टींवरून चिंतातुर होतात किंवा संताप व्यक्त करतात. अशा मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, नाही तर मद्यपान, अमली पदार्थाचे सेवन, लैंगिक संबंध किंवा कोणत्याही वाईट गोष्टींच्या जाळ्यात ते अडकतात. त्यामुळे पालकांनी 10 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांकडे अधिक सजगपणे पाहणे गरजेचे आहे. तसेच किशोरवयीन मुलींच्याही अनेक समस्या असतात. या समस्यांचे निराकरण झाले नाही, तर त्यांची मानसिक अवस्था बिघडते.
असे मत, स्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख यांनी व्यक्त केले.

किशोरावस्थेतील मुलांना शरीरात होणाऱ्या संप्रेरकांमुळे आणि अन्य स्थित्यंतरांमुळे भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. मात्र या आकर्षणाला प्रेम समजून त्यात वाहवत जाणे, लैंगिकदृष्ट्या अनैतिक गोष्टी करणे अशा गोष्टी घडतात. यामुळे शैक्षणिकदृष्ट्या लक्ष विचलित होणे, प्रेमभंग वगैरेमुळे नैराश्‍य येणे, अनैसर्गिक कृत्यांमुळे शारीरिक आजार होणे अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याशिवाय किशोरवयीन मुले अधिक साहसी, बेधडक तसेच निर्भय असतात. संकटांना आणि गहन प्रश्नांना भिडण्याची त्यांची वृत्ती असते. त्याचबरोबर धोक्‍याचे मोजमाप करून, तो पारखून धोका पत्करण्याच्या क्षमतेचा विकास पूर्ण झालेला नसल्याने, यावयात चुका होण्याचे प्रमाणही जास्त असते. किशोरवयीन मुली जर या वयात चुकीच्या मार्गाला लागल्या तर, त्याचे परिणाम त्यांच्या भविष्यावर, मातृत्वावर आणि संपुर्ण कुटुंबावर होतात म्हणून याकाळत मुलींना अधिक सांभाळणे गरजेचे आहे.

किशोरावस्थेतील बदल
किशोरावस्थेत पाऊल टाकताच मेंदूमधून काही संप्रेरके स्त्रवू लागतात. त्यांच्या प्रभावाने मुलांच्या बाबतीत टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स निर्माण होतात. या हार्मोन्सद्वारे अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक परिणाम या मुलामुलीत घडवून आणतात.
स्वत:ची मते मांडण्यास सुरूवात
या वयात मुले आपली स्वतंत्र मते मांडण्यास सुरूवात करतात. आजवर आईवडील, शिक्षक यांच्या विचारांनी वागणाऱ्या मुलांना, आपल्यालाही काही कळते असे वाटू लागते. मोठ्यांनी सांगितलेले खरे असतेच असे नाही, हे त्यांना समजते आणि आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त कळते, अशा भावना मनात निर्माण होतात. त्यामुळे बऱ्याच बाबतीत आईवडील-ज्येष्ठ किंवा शिक्षकांपेक्षा मित्रांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याकडे कल वाढतो.

मुलींना हवा मानसिक आधार
जगभरातील किशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्याबाबत एका आरोग्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात काही ठळक बाबी समोर आल्या आहेत.

  •  मानसिक विकारांना बळी पडलेल्या अनेक मुली मानसिक आधार शोधत असतात. त्यापैकी 42 टक्के मुली अमली पदार्थाचे सेवन करतात.
  •  33 टक्के मुली मद्यपान करतात.
  • 29 टक्के मुली धुम्रपानाचा आधार घेतात.
  • सर्वाधिक धोकादायक म्हणजे 16 ते 21 वयोगटातील 42 टक्के मुलींना अनियोजित गर्भधारणा झालेली असते.
  • 34 टक्के मुली असुरक्षित लैंगिक संबंध ठेवतात.

लैंगिक आजार
मुक्त जीवनशैलीमुळे आज लैंगिक संबंधातून निर्माण होणाऱ्या एड्‌स, हिपॅटायटीस बी, एचपीव्ही, जनायटल हर्पिस अशा आजारांची संख्या वाढते आहे. या आजारांनी पीडित रुग्णात 30 टक्के रुग्ण किशोरवयीन वयोगटातील असतात. यामधील एड्‌सच्या रुग्णांची संख्या कमी होत चालली असली तरी एड्‌सग्रस्त व्यक्तींमध्ये आजही या वयोगटातील किशोरांची संख्या इतर वयोगटांच्या तुलनेत जास्त आहे.

मानसिक आजार
आजच्या स्पर्धात्मक जगात पालकांच्या आणि समाजाच्या या किशोरांकडून असलेल्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करता न आल्याने येणारे नैराश्‍य कमालीचे वाढते आहे. शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा आणि कलाविषयक गोष्टीत अपेक्षित प्राविण्य किंवा यश या अपेक्षा समाविष्ट आहेत. एका पाहणीनुसार 26 टक्के किशोर या बाबतीत उद्भवणाऱ्या ताणतणावाच्या विकारांनी पीडित आहेत.

खेळ आणि योगाभ्यास आवश्‍यक
किशोरवयीन मुलांमध्ये होणाऱ्या शारीरिक मानसिक बदलांमुळे या काळात त्यांच्याकडून होणाऱ्या चुकांची संख्याही मोठी असते. त्या टाळण्यासाठी पालकांनी या वयातील मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवावा. तसेच पुर्वी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती ज्याप्रमाणे मुलांवर अध्यात्मिक गोष्टींचे संस्कार करीत होते त्याचे महत्व जाणून, मुलांचे मन स्थिर राहावे यासाठी आध्यात्मिकतेसह योगाअभ्यासावरही भर द्यावा. क्रीडा आणि योग या दोनच माध्यमातून या वयातील अनियंत्रित हार्मोन्सवर मात करता येऊ शकते.
डॉ. सुषमा देशमुख, स्रीरोगतज्ज्ञ, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mental health of adolescent