मेट्रोत प्रवासीसंख्येचा आलेख उंचावला, एका दिवसात 17 हजार नागरिकांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

हिंगणा मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने एमआयडीसीमधील चाकरमाने, विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना मोठी सुविधा झाली. हिंगणा मार्गावर दर अर्ध्या तासाने मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रोला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे.

नागपूर ः वर्धा मार्गावरील मेट्रोमुळे दहा हजारांपर्यंत असलेली प्रवासीसंख्या हिंगणा मार्गामुळे सतरा हजारांवर पोहोचली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने वर्धा व हिंगणा मार्गावरील मेट्रोतून 17 हजार 718 प्रवाशांनी प्रवास केला. महामेट्रोला तिकीट विक्रीतून एका दिवसात सव्वातीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

अवश्य वाचा - निघाला होता शाळेत; रस्त्यात ट्रकखाली सापडला

हिंगणा मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने एमआयडीसीमधील चाकरमाने, विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना मोठी सुविधा झाली. हिंगणा मार्गावर दर अर्ध्या तासाने मेट्रोची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी मेट्रोला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. लोकमान्यनगर ते सीताबर्डी व सीताबर्डी ते खापरीपर्यंतच्या प्रवासासाठी केवळ 30 रुपये तिकीट दर आहे. त्यामुळे हिंगणा मार्गावरील प्रवासी मेट्रोतून प्रवासाचा आनंद लुटत आहेत. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर किंवा वासुदेवनगरपर्यंत प्रवासासाठी प्रवाशांना केवळ 20 रुपये मोजावे लागत असून, सीताबर्डी इंटरचेंज ते सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स किंवा झाशी राणी चौक मेट्रो स्टेशनपर्यंतच्या प्रवासासाठी केवळ 10 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे हिंगणा मार्गावरील स्टेशन असो की लोकमान्यनगर ते खापरीपर्यंतचा प्रवास, नागरिक बिनधास्तपणे प्रवासाचा आनंद लुटत आहेत. काल, रविवारची सुटी असल्याने अनेक नागपूरकरांनी लोकमान्यनगर तसेच खापरीपर्यंत मेट्रोतून प्रवास केला. विशेषतः लोकमान्यनगरपर्यंतचा किंवा हिंगणावासींनी सीताबर्डीपर्यंतच्या प्रवासामुळे मेट्रोच्या प्रवासीसंख्येचा आलेख चांगलाच वाढला. रविवारी 17 हजार 718 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केल्याचे महामेट्रोने नमूद केले आहे. यातून महामेट्रोला 3 लाख 20 हजारांचे उत्पन्न मिळाले. शहराच्या दोन प्रमुख मार्गांवर मेट्रो धावत असल्याने नागरिकांना मोठा लाभ झाला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro Traveler population graphs rise, 17 thousand citizens travel in one day