व्हिडियो) पंचमुखी स्वयंभू महादेवाचा महिमा थोर, या चमत्कारामुळे श्रावणात भाविकांची रीघ...

सतीश तुळसकर
Monday, 10 August 2020

मंदिराचे वैशिष्ट्य असे की, मंदिराचा गाभारा जमिनीपासून साधारणतः १० फूट खोल आहे. त्या ठिकाणी पंचमुखी शिवलिंगाची स्थापना केली आहे. महत्वाचे म्हणजे श्रावणात या मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिकरीत्या पाण्याची पातळी वाढत जाते आणि शिवलिंग पाण्याखाली येते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नंदी जमिनीच्या पातळीवर आहे.

उमरेड (जि. नागपूर) : सध्या श्रावण महिना सुरू आहे. वैदिक काळापासून हिंदू धर्मात या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिन्यात शिवपिंडीच्या पूजेला विशेष महत्व आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा मोठ्या भक्तिभावाने केली जाते. असेच एक महादेवाचे प्राचीन त्यासोबतच रहस्यमयी अनोखे शिवमंदिर उमरेड शहरातील मंगळवारीपेठेत अनेक वर्षांपासून इतिहासाची साक्ष देत उभे आहे. तलावाच्या पाण्याची पातळी आणि मंदिराच्या गाभाऱ्यात पाण्याची पातळी समतल असते, अशी आख्यायिका सांगितली जाते. जाणून घेऊया काय आहे प्रकार...

मंदिराचा गाभारा जमिनीपासून १० फूट खोल... 

मंदिराचे वैशिष्ट्य असे की, मंदिराचा गाभारा जमिनीपासून साधारणतः १० फूट खोल आहे. त्या ठिकाणी पंचमुखी शिवलिंगाची स्थापना केली आहे. महत्वाचे म्हणजे श्रावणात या मंदिराच्या गाभाऱ्यात नैसर्गिकरीत्या पाण्याची पातळी वाढत जाते आणि शिवलिंग पाण्याखाली येते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नंदी जमिनीच्या पातळीवर आहे. परंतु गाभाऱ्यात असणारे स्वयंभू पंचमुखी शिवलिंग दहा फूट खोलात असल्याने हे मंदिर अनोखे वाटते. महादेवाचे शिवलिंग आणि त्यासमोर असलेला नंदी हे प्रत्येक मंदिरात समतल असल्याचे पाहायला मिळते. परंतु येथे तसे नाही.

 

तलावाच्या पाण्यासोबत वाढते गाभाऱ्यातील पाणी...

मंदिरापासून एक किमी अंतरावर असलेल्या गांधीसागर जलाशयाच्या (गाव तलाव) पाण्याची पातळी पावसाच्या पाण्याने जसजशी वाढते तशीच मंदिराच्या गाभाऱ्यात देखील वाढते, अशी आख्यायिका या ठिकाणी ऐकिवात आहे. तलावातील जलवाहिन्या थेट मंदिराच्या गाभाऱ्याशी जोडल्या गेल्या असल्याने त्या ठिकाणी झरे असल्याचे दिसून येतात. काही वर्षांपूर्वी मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी मंदिराच्या गाभाऱ्यातील पाण्याचे झरे बुजविण्याचा प्रयत्न स्थापत्य अभियंत्यांनी  केला, परंतु त्यात ते सपशेल अपयशी ठरले. श्रावण महिन्यात कायम गर्दीने गजबजले असणारे पाताळेश्वर मंदिर यावेळी कोरोनाचा पार्श्वभूमीवर भाविकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.

सविस्तर वाचा - प्रेमाखातर स्वीकारला मुस्लीम धर्म अन् झाली दोन मुलांची आई, तरीही प्रेम विवाहाचा करुण अंत
 

भक्तांची निरंतर रीघ...

पाताळेश्वर मंदिराच्या उत्तरेला प्राचीन काळा गणपती तर दक्षिणेला लाल गणपतीचे मंदिर आहे. एकूणच तो परिसर पूर्वी उमरेड नगरीवर राज्य करणाऱ्या राजाच्या काळात अतिशय महत्वाचा आणि मध्यवर्ती ठिकाण असल्याचे समजते. दरवर्षी दूरवरून महादेवाचा जलाभिषेक करणारी जल देवता आणि देवाधिदेव उमापती पंचमुखी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी भेट देत असतात.

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miracle of panchamukhi Swayambhu Mahadev temple in umred