नागपूरच्या उपमहापौरांच्या फोनला आमदाराचाही नाही प्रतिसाद; नागनदी; स्वच्छता मोहिमेकडे लोकप्रतिनिधींची पाठ

MLAs avoid to come at Nag river cleaning pogram in Nagpur
MLAs avoid to come at Nag river cleaning pogram in Nagpur

नागपूर : पावसाळ्यापूर्वी नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता मोहिमेला आजपासून सुरूवात झाली. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या अभियानाच्या प्रारंभासाठी आयोजित कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींनीच पाठ फिरवली. विशेष म्हणजे उपमहापौर मनीषा धावडे यांनी कार्यक्रमात आमंत्रित करण्यासाठी केलेल्या फोन कॉललाही एका आमदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात झाली.

कोरोनाच्या संकटातही शहरातील तिन्ही नद्या स्वच्छता मोहीम लोकसहभाग व केंद्रीयमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, नगरसेवकांच्या फौजेसह थाटात सुरू करण्याचा बेत महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी आखला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही शहरात तीन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजनावर ‘सकाळ'ने ९ एप्रिल रोजी ‘कोरोना काळात रविवारी नाग नदी किनाऱ्यावर मेळा` व आज ११ एप्रिलला ‘कोरानाने मरताहेत तर मरू दे, इव्हेंट होणारच!` या मथळ्यासह ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताने प्रशासनातही चांगलीच खळबळ माजली. 

शिवाय आमंत्रित करण्यात आलेल्या आमदारांनीही कार्यक्रमात येण्याचे टाळले. प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत कमीत कमी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रम केला. नाग नदी स्वच्छता अभियानाला अशोक चौक येथे प्रारंभ झाला. आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, धंतोली झोन सभापती वंदना भगत यांचे हस्ते यंत्रसामुग्रीची पूजा करण्यात आली. तत्पूर्वी उपमहापौर मनीषा धावडे यांनी एका आमदाराला आमंत्रित करण्यासाठी तीन चार वेळा कॉल केला. परंतु संबंधित आमदाराने त्यांना प्रतिसाद दिला नाही.

पिवळी नदी स्वच्छता अभियानाला नारा घाट परिसरातून सुरुवात करण्यात आली. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, झोन सभापती प्रमिला मथराणी, नगरसेवक विकी कुकरेजा, नगरसेविका सुषमा चौधरी, कर व कर आकारणी समिती सभापती महेन्द्र धनविजय यांनी यंत्रांची पूजा केली. सहकारनगर घाट परिसरात पोहरा नदी स्वच्छता मोहिमेला स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, विधी समिती सभापती मीनाक्षी तेलगोटे, माजी आमदार अनिल सोले यांनी सुरुवात केली. 

यावेळी संबंधित झोनचे अधिकारी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे जलसंधारणाकरीता मोठे योगदान असून त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून नदी स्वच्छता अभियानास सुरुवात केल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. या तिन्ही कार्यक्रमात सामाजिक व पर्यावरणप्रेमी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याचा मोहही प्रशासनाने टाळले.

आयुक्त संतप्त

नदी स्वच्छता मोहीम थाटात सुरू करण्‍याच्या प्रयत्नांवरून आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही आज सकाळी संताप व्यक्त केल्याचे सूत्राने नमुद केले. त्यांनी कार्यक्रम रद्द करून थेट नदी स्वच्छतेला सुरुवात करण्याच्या सूचनाही दिल्या. परंतु आज तीन ठिकाणी कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने कमीत कमी लोकांत होऊ द्या, अशी विनंती काही अधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे आयुक्त नरमल्याचेही सूत्राने सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com