आनंदवार्ता...आता एकाच ऍपवर सर्व विभागांच्या तक्रारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

मनपामध्ये युरोपियन युनियनच्या सहकार्याने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे मागील तीन वर्षांपासून इक्वी-सिटी प्रकल्प कार्यान्वित आहे. संपूर्ण शहरात समानतेच्या तत्त्वाने नागरी सुविधा पुरविण्याबाबत प्रकल्पाद्वारे कार्य केले जाते.

नागपूर : नागरिकांना मूलभूत सुविधा प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिका तत्पर आहे. मात्र, या सुविधांसह नागरिकांना अनेक अडचणींचाही सामना करावा लागतो. या समस्यांची तक्रार करताना कुठल्या विभागाकडे कोणती तक्रार करायची, यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत पुढाकार घेत मनपातर्फे "इक्वी-सिटी मोबाईल ऍप' तयार करण्यात आले. या ऍपच्या माध्यमातून एका ठिकाणी आपण नोंदविलेली तक्रार ज्या विभागाची तक्रार आहे त्या संबंधित विभागाकडे जाईल व त्यावर आवश्‍यक कार्यवाही करण्यात येईल. 

मनपामध्ये युरोपियन युनियनच्या सहकार्याने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे मागील तीन वर्षांपासून इक्वी-सिटी प्रकल्प कार्यान्वित आहे. संपूर्ण शहरात समानतेच्या तत्त्वाने नागरी सुविधा पुरविण्याबाबत प्रकल्पाद्वारे कार्य केले जाते. याच प्रकल्पाच्या माध्यमातून इक्वी-सिटी मोबाईल ऍप तयार करण्यात आले आहे. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर नागरिकांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. 

हेही वाचा : नवलच की! चक्‍क साप खातो कापूस

इक्वी-सिटी मोबाईल ऍपमध्ये मनपा सेवांबद्दल प्रश्‍नावली आधारित सर्वेक्षण आहे. या आधारे सेवांबाबत नागरिकांचे समाधान व असमाधान याविषयी विश्‍लेषण केले जाईल. नागरिकांनी नोंदविलेला हा अभिप्राय सुविधांबाबत कमकुवत असलेल्या प्रभागांमध्ये मनपाने सेवा सुधारण्याच्या दृष्टीने आवश्‍यक निर्णयासाठी सहायक ठरणार आहे. अचूक वेळेत सर्वेक्षण डेटा प्राप्त करण्याबाबत वेब आधारित बॅकएंड आहे. यामुळे नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांच्या गुणवत्तेबाबत विश्‍लेषणासंदर्भात मनपाला योग्य माहिती मिळवून देण्यासाठी मदत होईल. 

मनपा सुविधांबद्दल नागरिकांमार्फत प्रशासनाला अभिप्राय किंवा सूचना पोहोचविण्यासाठी हा एक सेतू म्हणून कार्य करेल. नागपूर महानगरपालिकेचे पारदर्शी प्रशासनिक कार्य विकसित होऊन त्याचा नागरिकांना लाभ व्हावा यासाठी प्रभाग आणि झोनस्तरावर सुविधा स्तर देखरेखीसाठी या माध्यमातून केंद्रीकृत डॅशबोर्ड प्रदान केले जाणार आहे. 

 
प्रभागांची सीमा, नगरसेवकांची माहिती  

महानगरपालिकेमध्ये प्रभाग पद्धती अस्तित्वात आहे. एका प्रभागामध्ये चार नगरसेवक आहेत. त्यामुळे आपल्या प्रभागाची सीमा, नगरसेवक याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम असतो. ऍपद्वारे झोन, प्रभाग याबाबद्दल इत्थंभूत माहिती मिळणार आहे. प्रभागाची सीमा तसेच प्रभागातील नगरसेवकांचे नाव, त्यांचे संपर्क क्रमाक तसेच इतर माहिती मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mob aap news about nagpur nmc