नागपूर जिल्ह्यातील मोक्षघाट किल्ले कोलार’ ठरतोय ‘मौत का कुवॉं’

दिलीप गजभिये
Monday, 21 September 2020

सुटीच्या दिवशी किंवा राखविसर्जनास येथे बहुतांश लोक येतात. कोलार नदीत तरुणांना मोह आवरत नाही. आणि इथेच घात होतो. अनेकांना खोल खड्डयांचा आणि डोहाचा अंदाज येत नाही. म्हणून अनेकांचे पोहताना बळी जातात. म्हणून हे ठिकाण ‘मौत का कुवॉं’ ठऱत आहे

खापरखेडा (जि.नागपूर): किल्लेकोलार हे नागपूर जिल्ह्यातील पीकनिक प्वाइंट म्हणून लोकप्रिय आहे.  सुटीच्या दिवशी किंवा राखविसर्जनास येथे बहुतांश लोक येतात. कोलार नदीत तरुणांना मोह आवरत नाही. आणि इथेच घात होतो. अनेकांना खोल खड्डयांचा आणि डोहाचा अंदाज येत नाही. म्हणून अनेकांचे पोहताना बळी जातात. म्हणून हे ठिकाण ‘मौत का कुवॉं’ ठऱत आहे. आजपर्यंत येथे अनेक घटना घडल्या आहेत.

अधिक वाचाः विकासकामांवरून नव्हे निव्वळ भूमिपूजनावरून झाला वाद, माजी आमदार पुत्रावर गुन्हा
 

मोह आवरता आला नाही
 मित्राच्या आजीचे अस्थिविसर्जन करायला गेलेल्या तीन मित्रांचा किल्ले कोलार घाट येथील कोलार नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी  दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये प्रशासनाने दोघांचे मृतदेह घटनेच्या दिवशी रात्री काढले.  रात्रीची वेळ असल्याने तिसरा मृतदेह सापडू शकला नाही. त्यामुळे तिसरा मृतदेह आज रविवारी सकाळच्या सुमारास काढण्यात यश आले. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सुमित बंडू सरोदे व मृत तिघेही जिवलग मित्र होते. चौघेही कॅटरिंगचे काम करायचे. मित्राच्या आजीचे शुक्रवारी अल्प आजाराने निधन झाले. दरम्यान दुसऱ्या दिवशी शनिवारी अस्थिविसर्जन करण्यासाठी बहुतेक मित्र किल्ले कोलार घाटावर आले. अस्थिविसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांत महिला व वयस्कांपेक्षा युवकांचे प्रमाण अधिक होते. अस्थिविसर्जन  आटोपले आणि काही मित्रांना अंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही. या घाटावर कोलार नदीत ‘मौत का कुवा’ असा ‘स्पॉट’ आहे.

अधिक वाचाः जिवंत असताना नातेवाइकांना घेऊ दिले नाही मुखदर्शन...

घरच्या मंडळींना समजले नाही का ?
अशा जीवघेण्या ठिकाणी शांतनु उर्फ नयन कैलास खेडकर (वय२०, नवीन बाबुळखेडा, नागपूर) हा अंघोळीसाठी मित्रासह गेला अन् त्याने  पाण्यात उडी मारली. तो बुडायला लागताच दुसरा मित्र आकाश राजेंद्र राऊत (वय२५, रामेश्वरी नागपूर) याने मित्र बुडाल्याचे पाहून उडी मारली व त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हासुद्धा बुडाला. त्याला वाचविण्यासाठी पुन्हा तिसरा मित्र हर्षित राजू येदवान (वय२०, लाकडीपूल नागपूर)यानेही उडी मारली, पण तोसुद्धा बुडाला. वेळ सायंकाळची असल्याने एनडीआरएफच्या टीमने उशिरापर्यंत शनिवारी आकाश व शांतनू या दोघांना काढण्यात आले. मात्र आज रविवारी सकाळच्या सुमारास हर्षदचा मृतदेह मिळाला. मृतदेह  शवविच्छेदनाकरीता मेयो रुग्णालयात हलविले असून खापरखेडा पोलिसांनी  घटनेची नोंद केली. एकीकडे मृत आकाशच्या वडिलांनी आरोप केला आहे की, अस्थिविसर्जनासाठी युवा वर्ग मित्र अधिक अन् वयस्क शहाणे कमी, असे असतानाही ‘मौत का कुवा’ या खोलगट भागात त्यांना कसे जाऊ दिले? घरच्या मंडळींना समजले नाही का ?असा संतप्त सवाल करीत माझा एकुलता एक मुलाचा जीव यांच्यामुळेच गेला, असे सांगत लवकरच पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या घरचे अस्थिविसर्जन होते, त्यांच्याकडे युवा मंडळी घटनेच्या दिवशी दारू पिऊन नशेत असल्याचे मृताचे वडील म्हणाले.
 
संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mokshaghat fort in Nagpur district, Kolar, is becoming a 'death well'.