मॉन्सूनच्या पहिल्याच दणक्‍याने उडविली तारांबळ, नागपुरातील या भागात साचले पाणी...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

परवा विदर्भात दाखल झालेल्या मॉन्सूनने शनिवारी उपराजधानीत अधिकृत प्रवेश केला. मात्र, पाऊस न आल्याने नागपूरकरांना मॉन्सूनचा पाहिजे तसा आनंद घेता आला नाही. मात्र, रविवारी वरुणराजाने चांगलाच दणका दिला.

नागपूर  : शनिवारी पावसाविना नागपुरात दाखल झालेल्या मॉन्सूनने आज अचानक आपला रंग दाखविला. विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगर्जनेसह आलेल्या मॉन्सूनच्या पहिल्या पावसाने अख्खे शहर चिंब भिजविले. जवळपास तासभर बरसलेल्या धुवाधार पावसामुळे नागपूरकरांची चांगलीच तारांबळ उडविली. जागोजागी पाणी साचले. शिवाय ठिकठिकाणी विद्‌युत पुरवठाही खंडीत झाला. पण, त्याचवेळी पहिल्या पावसाचा अनेकांनी आनंदही घेतला. विदर्भात मॉन्सून सक्रिय झाल्याने आणखी काही दिवस वरुणराजा बरसणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

परवा विदर्भात दाखल झालेल्या मॉन्सूनने शनिवारी उपराजधानीत अधिकृत प्रवेश केला. मात्र, पाऊस न आल्याने नागपूरकरांना मॉन्सूनचा पाहिजे तसा आनंद घेता आला नाही. मात्र, रविवारी वरुणराजाने चांगलाच दणका दिला. शहरात सकाळपासून ऊन व ढगाळ वातावरणही होते. परंतु, पावसाचा थेंबही पडला नाही. दुपारी तीननंतर अचानक आभाळ दाटून आले. पाहता पाहता धुंवाधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर शहरात सगळीकडेच विजांच्या कडकडाटांसह दणादण बरसला.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना

त्यानंतरही अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. छत्र्या व रेनकोटअभावी अनेक जण भिजले. पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधावा लागला. पावसादरम्यान रस्त्यांवर जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसत होते. नरेंद्रनगर व लोखंडी पुलाखाली मांडीभर पाणी साचले होते. त्यामुळे पाण्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. शंकरनगर, जगनाडे चौक, अनंतनगर, दयानंदनगर, ज्योतीनगर, सेंट्रल एव्हेन्यू, जरीपटकासह अनेक ठिकाणी पाणी जमा झाल्याच्या अग्निशमन विभागाकडे तक्रारी आल्या.

आजच्या पावसामुळे तापमानातही घट होऊन नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. आल्हाददायक वातावरणात अनेकांनी भिजण्याचा आनंद घेतला. सुटीचा दिवस असल्याने काहींनी घराच्या बाल्कनीतूनच वातावरणाचा "फील' अनुभवला. पावसामुळे काही ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. हवामान विभागानुसार, हा मॉन्सूनचा केवळ "ट्रेलर' होता. विदर्भात मॉन्सून सक्रिय असल्याने पुढील काही दिवसांत आणखी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत 35 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
 

खड्डे ठरणार धोकादायक

पावसाने प्रशासनाचीही पहिल्याच दिवशी पोलखोल केली. शहरात सध्या जागोजागी सिमेंट रोडचे काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बांधकाम बंद असल्याने ते अर्धवट स्थितीत आहेत. एका बाजूने सिमेंट रोड आणि दुसऱ्या बाजूने खोलगट रस्ता आहे. अशा ठिकाणी पाणी साचत असल्याने या पावसाळ्यात हे खड्डे धोकादायक ठरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अपघात होऊन जीव जाण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.
 

रेनकोट, छत्र्या खरेदीसाठी गर्दी

मॉन्सूनच्या आगमनासोबतच आता रेनकोट व छत्र्या खरेदी करण्याचीही लगबग सुरू झाली. रविवारी सीताबर्डी, इतवारी, महाल, गांधीबागसह शहरातील अनेक दुकानांमध्ये ग्राहक छत्र्या व रेनकोट खरेदी करताना दिसून आले. शिवाय कपाटातील छत्र्या व रेनकोटही बाहेर पडू लागले आहेत. हवामान विभागाने यंदा दणकेबाज पावसाची शक्‍यता वर्तविल्याने चांगल्या कमाईच्या आशेने दुकानदारही खूश आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Heavy rains in Nagpur city