
एक जूनला केरळमध्ये आगमन झाल्यानंतर अरबी समुद्रात उसळलेल्या "निसर्ग' चक्रीवादळामुळे मॉन्सूनला गती मिळाली असून, मॉन्सूनचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे.
नागपूर : गुरुवारी कर्नाटकच्या किनारपट्टीत दाखल झालेल्या मॉन्सूनचा प्रवास अपेक्षेप्रमाणे वेगाने सुरू असल्यामुळे विदर्भात मॉन्सूनचे आगमन निर्धारित वेळेत होण्याची दाट शक्यता आहे. सध्याची वाटचाल लक्षात घेता, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मॉन्सूनचे विदर्भात आगमन अपेक्षित आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहे.
एक जूनला केरळमध्ये आगमन झाल्यानंतर अरबी समुद्रात उसळलेल्या "निसर्ग' चक्रीवादळामुळे मॉन्सूनला गती मिळाली असून, मॉन्सूनचा प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. कर्नाटक व गोव्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याची माहिती आहे. पोषक वातावरण पुढेही कायम राहिल्यास येत्या 15 ते 18 जूनदरम्यान विदर्भात मॉन्सून धडक देण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी सांगितले.
तरुणाला डॉक्टर बनविण्यासाठी स्वतःची झोळी रिकामे करणारे अबरारभाई...
तथापि मॉन्सून विदर्भात नेमक्या कोणत्या तारखेला येईल, याविषयी त्यांनी ठामपणे सांगितलेले नाही. त्यासंदर्भात दोन- तीन दिवसांआधीच कळविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सामान्यत: विदर्भात मॉन्सून 15 जूनपर्यंत येतो. गतवर्षी आठवडाभर उशिरा म्हणजेच 21 जूनला आगमन झाले होते. उशिरा आगमन होऊनही सरासरीच्या (943 मिलिमीटर) 112 टक्के (1057 मिलिमीटर) पाऊस बरसला होता. भारतीय हवामान विभागाने यंदाही सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभर मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बसरल्या. मुंबई, पुण्यासोबतच विदर्भाला पावसाने झोडपून काढले. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून, गेल्या काही दिवसांपासून तापमानातही कमालीची घट झाली. आगामी काळात पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.