गुड न्यूज... विदर्भात 15 जूनपर्यंत मॉन्सून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

मॉन्सूनच्या प्रवासात कसलाही अडथळा न आल्यास तो विदर्भात निर्धारित वेळेत म्हणजेच 15 जूनपर्यंत विदर्भात येण्याची शक्‍यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टाही सध्या मॉन्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल मानला जात आहे. याउलट मॉन्सूनच्या मार्गात अडथळा आल्यास आगमन लांबणीवरही पडू शकते. 

नागपूर : मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मॉन्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार असून, अनुकूल वातावरण पुढेही कायम राहिल्यास मॉन्सून 15 जूनच्या आसपास विदर्भात धडक देण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंफान वादळामुळे अडखळलेल्या मॉन्सूनने पुन्हा वेग धरला असून, येत्या 72 तासांत तो केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्‍यता आहे. मॉन्सूनच्या प्रवासात कसलाही अडथळा न आल्यास तो विदर्भात निर्धारित वेळेत म्हणजेच 15 जूनपर्यंत विदर्भात येण्याची शक्‍यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टाही सध्या मॉन्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल मानला जात आहे. याउलट मॉन्सूनच्या मार्गात अडथळा आल्यास आगमन लांबणीवरही पडू शकते. 
सामान्यतः विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाची तारीख 15 जून आहे. मात्र गेल्या वर्षी आठवडाभर उशिरा म्हणजेच 22 जूनला आगमन झाले होते. त्याउपरही विदर्भात विक्रमी 1057 मिलिमीटर पाऊस बरसला होता, जो सरासरीच्या (943 मिलिमीटर) बारा टक्के अधिक होता. जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यात वरुणराजा चांगलाच बरसला होता. यंदाही भारतीय हवामान विभागाने सरासरी पावसाचा दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे. 

Video : खासदार पत्नी  आमदार पतीचे केस कापतात तेव्हा...

नागपूर, चंद्रपूर 45.6 

ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील उन्हाची लाट आज काहीशी ओसरली. तरीही सर्वाधिक तापमानाची नोंद नागपूर व चंद्रपूर येथे करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांत शुक्रवारी पारा 45.6 अंशांवर होता. त्याखालोखाल अमरावती येथे 45.4 आणि ब्रह्मपुरी येथे 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उन्हाची लाट आणखी चोवीस तास कायम राहणार असून, शनिवारनंतर मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon in Vidarbha till 15th June