‘फेस डिटेक्शन' निव्वळ नावापुरतेच, या शहरातील अर्धेअधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद

अनिल कांबळे  
Thursday, 13 August 2020

स्मार्ट सीटी प्रोजेक्ट अंतर्गत मनपा इमारतीच्या सहाव्या माळ्यावर शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मुख्य कार्यालय (सीओसी) आहे. सेफ अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ५२० कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी सव्‍‌र्हिलन्सचा प्रकल्प उभारला गेला.

नागपूर :  मोठा गाजावाजा करीत मनपाने उपराजधानीत जवळपास ३६०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यापैकी अर्धेअधिक कॅमेरे बंद, नादुरूस्त आहेत. तर शेकडो कॅमेरे झाडाझुडूपात लपलेले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या उद्देशाला तडा जात असून याकडे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट सीटी प्रोजेक्ट अंतर्गत मनपा इमारतीच्या सहाव्या माळ्यावर शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मुख्य कार्यालय (सीओसी) आहे. सेफ अ‍ॅण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ५२० कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी सव्‍‌र्हिलन्सचा प्रकल्प उभारला गेला. शहरातील ६६७ लोकेशनवर ३ हजार ६०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

५१ ठिकाणी नागरिकांना सूचना देण्यासाठी पीए सिस्टीम लावण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील अर्धेअधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती आहे. देखभाल करणारी यंत्रणा थातूरमातूर काम बघत आहे. बंद असलेले कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी मॅनपॉवर नसल्याचे कारण सांगितल्या जात आहे.

अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा
 

रात्री वाहनांचे क्रमांक दिसत नाहीत

कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे आणि गुन्ह्याचा तपास करण्यात होतो. पण रात्रीच्या अंधारात वाहन क्रमांक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद होत नाही. शिवाय चालत्या वाहनांचे क्रमांक स्पष्टपणे दिसत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास घडणारे गुन्हे व अपघातांच्या तपासामध्ये पोलिसांसमोर अनेक अडचणी येत आहेत.
 

‘फेस डिटेक्शन' फक्त नावापुरतेच

अडीच ते तीन लाख रूपये किंमत असलेले ‘फेस डिटेक्शन' कॅमेरे शहरात बसविण्यात आले आहेत. तसेच लाखो रूपये किंमतीचे ‘नाईट व्हिजन' कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र लाखोंचे कॅमेरे लावल्यानंतरही योग्य प्रकारे काम करीत नसल्याच्या तक्रारी आहेत.
 

क्राईम डिटेक्शन होईल कसे?

शहरातील वाहतूक व्यवस्था आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा भरपूर उपयोग झाला. परंतु, आता कॅमेरे बंद असल्यामुळे क्राईम डिटेक्शन कसे होईल? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर ‘वॉच' ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than half of Nagpur's CCTV cameras are off