
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तेजलाल बिलोने हा वृद्ध आई आणि लहाण भावासह दुमजली घरात राहतो.
नागपूर ः घरातील वीजमिटर कापल्याच्या कारणावरून मुलाने वृद्ध आईशी वाद घालून मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अजनीत उघडकीस आली असून मुलावर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे. सुशिला ब्रीजलाल बिलोने (५४, सुजाता नगर, रामटेके गल्ली, अजनी) असे मृत पावलेल्या वृद्धेचे नाव असून आरोपी मुलगा तेजलाल ब्रीजलाल बिलोने (४०) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तेजलाल बिलोने हा वृद्ध आई आणि लहाण भावासह दुमजली घरात राहतो. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून वीज बील न भरल्यामुळे वीज कंपनीने त्यांच्या घरातील वीज पुरवठा बंद केला. तेव्हापासून ते वीज न वापरता दिव्याच्या उजेडात राहत होते.
जाणून घ्या - पोलिसांनी चक्क शेतकर्यांच वेश धारण करून केला जंगलात प्रवेश; पुढे आले हे वास्तव
२६ नोव्हेंबरला तेजलालकडे पाहुणे आले. घरात वीज नसल्यामुळे आई सुशिला यांनी बडबड सुरू केली. ‘तू वीज बील न भरल्यामुळे अंधारात राहावे लागत आहे. घरात पाहुणे आले असून त्यांना कुठे झोपवावे?’ असा प्रश्न सुशिला यांनी केला. त्यामुळे तेजलाल चिडला. त्याने आईशी वाद घातला आणि शिवीगाळ केली. त्यावेळी वरच्या माळ्यावर राहणाऱ्या लहान भावाने समजूत घातली आणी भांडण मिटले.
२८ नोव्हेंबरला आईने झापल्याची खुमखुमी मनात ठेवून तेजलालने मध्यरात्री आईशी वाद घातला. त्याने आईला जबर मारहाण केली. मारहाणीमुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तेजलाल झोपायला निघून गेला. सकाळपर्यंत वृद्धेचा मृत्यू झाला. सकाळी त्याने आईचा मृत्यू झाल्याची बोंब ठोकली. अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली. लहान भावाने आईला मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मानवी मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तेजलालने केलेल्या मारहाणीत सुशिलाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिस हवालदार अविनाश श्रीरामे यांच्या तक्रारीवरून हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तेजलाल बिलोनेला अटक केली.
संपादन - अथर्व महांकाळ