Video : शिकताहेत ऑनलाईन, आयांनो! आता व्हा तुम्हीच त्यांच्या टिचर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

आधुनिक संसाधनांद्वारे आणि नाविन्यपूर्ण पद्धतींनी विद्यार्थी अभ्यास करीत असले तरी, यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. यावर मात करून, पालकांना विशेषतः आईला मुलांच्या या ऑनलाईन अभ्यासाला सुसह्य बनविण्याचे कौशल्य अवगत करावे लागणार आहे.

नागपूर : कोरोना विषाणूचा बालकांना धोका होऊ नये, यासाठी अद्याप शाळा सुरू न करता मुलांनी घरूनच ऑनलाइन अभ्यास करावा अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाईन लर्निंगचे विविध पर्याय स्विकारावे लागत आहेत. वेबसाटस, युट्यूब व्हिडीओ आणि ऍप्सच्या सहाय्यानं मुले ऑनलाइन अभ्यास करीत आहेत. आणि यामध्ये पालकांची विशेषत: आयांचीच परीक्षा आहे. आधुनिक संसाधनांद्वारे आणि नाविन्यपूर्ण पद्धतींनी विद्यार्थी अभ्यास करीत असले तरी, यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.

 

यावर मात करून, पालकांना विशेषतः आईला मुलांच्या या ऑनलाईन अभ्यासाला सुसह्य बनविण्याचे कौशल्य अवगत करावे लागणार आहे.
लॉकडाउनच्या काळात सर्वच विद्यालये आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या होमवर्क देत आहेत. परंतु याचा पाहिजे तसा परिणाम होत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शाळेत शिक्षक व विद्यार्थ्याचा समोरासमोर संवाद होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान लगेच होते.

ऑनलाईन शिक्षणात ते शक्‍य नाही. ऑनलाइन अभ्यासाची सोय सर्वच पालकांकडे उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे . शिक्षकांनाही ऑनलाइन क्‍लासेस घेत असतांना अनेक अडचणी येत आहेत. इंटरनेटची अडचण तर आहेच. याशिवाय तांत्रिक अडचणीही येतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधे ऑनलाईन लिंक, ऑनलाइन प्रश्नमंजुषा, शब्दकोडे, चित्रकोडे, गोष्टी, अवांतर वाचन, चित्र रंगवा, सामान्यज्ञान चाचणी, गार्डन ऑफ वर्डस आदी बाबींचा समावेश असतो. शाळेत मुलं शिक्षकांच्या समोर असतात.

त्यामुळे त्यांच्या देहबोलीवर लक्ष ठेवता येते. ऑनलाइन शिक्षणात केवळ एकतर्फी संवाद आहे, त्यामुळे मुलं खरचं अभ्यास करीत आहेत की नाही, शिकवलेले त्यांना समजते आहे की नाही , हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. शाळेत शिक्षकांना जसे मुलांची आई होऊन त्यांची काळजी घ्यावी लागते अगदी तसेच या काळात आईलाही मुलांची शिक्षिका बनून त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

मुलांचा ऑनलाइन अभ्यास घेताना...

 • पालकांनी आपला मोबाईल लॅपटॉपला कनेक्‍ट करावा .
 • मोठ्या स्क्रिनवर मुलांना अभ्यास करणे सोपे होते. थोड्या वेळाने मुलांनी डोळ्यांचा व्यायाम करावा .
 • डोळे अधूनमधून थंड पाण्याने धुवावे.
 • ऑनलाइन क्‍लासेसमध्ये दिलेला रोजचा अभ्यास रोज केल्यास लिंक तुटणार नाही.
 • मुले घरीच असल्याने , अभ्यास मिस होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • क्‍लासेसमध्ये काढून दिलेल्या नोट्‌स मुले काढतात की नाही याकडे लक्ष द्यावे.
 • घरात दोन मुले असतील तर त्यांच्या क्‍लासेसचे टाईम टेबल आखून द्यावे .
 • इंटरनेट स्लो असल्यास, नंतर मिस झालेले व्हीडीओ डाऊनलोड करून अभ्यास रिकव्हर करावा .
 • शाळा सुरळीत होत नाही तोवर अभ्यासाची असलेली पर्यायी व्यवस्था आनंददायी करण्यासाठी प्रयत्न करावेत .
 • मुलं मोबाईलचा गैरवापर करीत नाहीत याकडे लक्ष द्यावे .
 • आईला मुलांचा अभ्यास घ्यावाच लागतो त्यामुळे याकडे लक्षपूर्वक व काळजीपूर्वक पाहत चिडचिड होऊ देऊ नये, सरकारने पर्यायी व्यवस्था आपल्या पाल्यांच्याच भविष्यासाठी केली आहे हे स्विकारावे.
 • दोन मुलांमध्ये भांडण होतात अशा वेळी टाईम टेबल आखून द्यावे. मनोरंजनासाठी वाचन ,घरचे खेळ, घरकामात मदत अशी कामे त्यांच्याकडून करून घ्यावीत.

ऑनलाईन शिक्षण चौपट वेळ
वर्गात शिकवण्यापेक्षा चौपट वेळ लागतोय ऑनलाइन शिक्षणाच्या पद्धतीत. शिक्षकांना स्वतः आधी पुस्तकातील सर्व मजकूर, ऑडीओ व्हिडीओच्या माध्यमातून समजावून सांगावा लागतो. याशिवाय काही नोट्‌स हाताने लिहून त्याचे फोटो काढून, मुलांच्या गृपवर टाकावे लागतात. काही प्रश्नमंजुषा गुगल चा वापर करून ऑनलाइन भरून घेतल्या जातात तर, काही ऑफलाइन या सर्वामध्ये शिक्षकांना एका धड्यासाठी शाळेच्या तुलनेत चौपट वेळ द्यावा लागत आहे.

ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था स्विकारली
मी स्वतः जॉब करते त्यामुळे ऑफीसला जातांना मोबाईल तासन तास मुलांकडे सोडून जावे लागते . ऑनलाइन शिक्षण ही पर्यायी व्यवस्था आहे त्यामुळे ती स्विकारण्याशिवाय दुसरा मार्ग आपल्याकडे नाही हे वास्तव मी स्विकारले आहे. आज ऑनलाइन क्‍लासेसमध्ये काय शिकवले, होमवर्क काय दिला यासर्व गोष्टींचा आढावा मी रोज घेते. याशिवाय मोबाईल हीस्ट्री चेक करून, मुलांकडून मोबाईलचा गैरवापर होत नाहीय ना याबाबतही वेळोवेळी खात्री करीत असते .
गीतांजली अतुल दिघेकर, पालक

मॅनेज करणे कठीण
वर्क फ्रॉम होम करीत असतांनाच मुलांनाही त्याच वेळी ऑनलाइन क्‍लासेससाठी मोबाईल हवा असतो . त्यांच्या व्हिडीओ क्‍लासेसमध्ये आणि ऑनलाइन अभ्यासात रोजचा दोन जी. बी. डाटा खर्च होऊन जातो . इंटरनेटही स्लो चालते अशात ऑफीस, घर आणि मुलं या सर्वांना मॅनेज करणे त्रासदायक झाले आहे .
गायत्री माळवदे, पालक, नागपूर

सविस्तर वाचा - तुमचे मुंढे तर आमचे डॉ. उपाध्याय, सोशल मीडियावर रंगतोय हा सामना

पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे
ऑनलाइन वर्ग घेतांना आम्ही शिकवलेले मुलांना कळतय की नाही ते कळतच नाही. आपण जे शिकवतो त्याचे आकलन विद्यार्थ्यांना होत आहे की नाही , हेही कळत नाही. तांत्रिक अडचणीवर मात करून, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. पालकांनी मुलांवर लक्ष केंद्रीत करून उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून,ऑनलाइन अभ्यासात मदत करावी. मुलं शाळेत असतांना शिक्षिकांना त्यांची आई व्हावे लागते तसेच आता , मुले घरी असतांना आईनेच त्यांची शिक्षिका होऊन त्यांच्या अभ्यासात मदत करणे अपेक्षित आहे .
दर्शना दिनेश भालेराव, शिक्षिका  

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mothers will be a teacher in online education of child