'महाराष्ट्रातही सरकार पाडण्याच्या हालचाली, पण...'

अतुल मेहेरे
सोमवार, 13 जुलै 2020

कर्नाटकमध्ये 100-100 कोटी रुपयांमध्ये आमदारांची खरेदी करण्यात आली. शेवटी पैसा सर्वांनाच प्रिय आहे. त्यामुळे त्यांचे फावते आहे. जे पैसे देऊन मानत नाहीत, त्यांना ईडीच्या कारवाईचा धाक दाखवला जातो. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी गुजरातमध्ये 25-25 कोटी रुपयांना आमदार विकत घेण्याचे काम भाजपने केले.

नागपूर : ज्या-ज्या राज्यांत भाजपचे सरकार नाही, तेथे ईडीच्या कारवाईचा धाक दाखवून आणि पैशाचे आमिष दाखवून केंद्रातील सरकार आणि राज्यातील भारतीय जनता पक्ष मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही हा प्रकार केला जात आहे. सोबतच महाराष्ट्रातही सरकार पाडण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण, हा महाराष्ट्र आहे, येथे महाराष्ट्र विकास आघाडी त्यांचा प्रयत्न कुठल्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, याची खात्री मी देऊ शकतो, असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

डॉ. राऊत यांनी पुढे सांगितले, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार जनतेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी स्थापन झाले आहे. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस सरकारची स्थापना झालेली आहे. त्यामुळे सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल, असे मला वाटत नाही. संपूर्ण देश कोरोनाच्या महायुद्धात लढतो आहे. देशात प्रचंड आर्थिक तणाव निर्माण झाला आहे. बेरोजगारी वाढली आहे आणि अशा स्थितीत समस्यांना वाचा फोडून न्याय देण्याची जबाबदारी केंद्र सरकावर आहे. अशा संकटसमयी त्यांचा हा प्रयोग लोकशाहीसाठी घातक ठरणारा आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, भाजपने हा प्रयोग करू नये आणि कोरोनाच्या लढ्यावर लक्ष केंद्रित करावे.

हेही वाचा : महापौर संदीप जोशींचा गौप्यस्फोट, म्हणाले आम्हाला 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचे कारस्थान

यापूर्वी कर्नाटकमध्ये 100-100 कोटी रुपयांमध्ये आमदारांची खरेदी करण्यात आली. शेवटी पैसा सर्वांनाच प्रिय आहे. त्यामुळे त्यांचे फावते आहे. जे पैसे देऊन मानत नाहीत, त्यांना ईडीच्या कारवाईचा धाक दाखवला जातो. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी गुजरातमध्ये 25-25 कोटी रुपयांना आमदार विकत घेण्याचे काम भाजपने केले. त्यापूर्वी मध्यप्रदेशचे सरकार पाडताना त्यांनी हेच काम केले. आता तोच प्रयोग राजस्थानमध्ये केला जातोय. लोकशाहीमध्ये पैशांचा, बळाचा वापर करून त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे देशाच्या लोकशाहीला घातक आहे आणि संविधानालाही छेद देणारे असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.

राजस्थानमध्ये आमदारांवर ईडीचा दबाव आहे. अनेकांच्या घरांवर धाडी पडल्या आहेत. राजस्थानचे सरकार सद्य:स्थितीत मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांच्या नेतृत्वात कायम आहे. उद्या चालून महाराष्ट्रातही हा प्रयोग केंद्र सरकारकडून केला जाण्याची शक्‍यता आहे. किंबहुना तो सुरू झाला आहे. पण महाविकास आघाडी येथे त्यांना यशस्वी होऊ देणार नाही, हे मात्र मी विश्‍वासाने सांगू शकतो, असे डॉ. राऊत यांनी नमूद केले.

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movements to overthrow the Maharashtra government too : Dr. Nitin Raut