एमएससी नर्सिंग कॉलेज नऊ वर्षांनंतरही कागदावरच; काय आहे नेमके कारण, वाचा सविस्तर

MSc Nursing College of Medical is still on paper after nine years
MSc Nursing College of Medical is still on paper after nine years

नागपूर : विदर्भासाठी घोषणा करायची आणि नंतर प्रलंबित ठेवायची ही महाराष्ट्र शासनाची जुनीच परंपरा. घोषणा करून थंडबस्त्यात ठेवण्याचे काम इमानेइतबारे राज्य शासनाकडून होत आहे. नऊ वर्षांपूर्वी मेडिकलशी संलग्न असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये "एमएससी नर्सिंग कॉलेज' उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयाला केराची टोपली दाखवण्याचा महापराक्रम शासनाकडूनच झाला आहे. शासनाने उपराजधानीत "एमएससी नर्सिंग कॉलेज' सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर इंडियन नर्सिंग कौन्सिल, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या सर्वोच्च संस्थांनी परवानगी दिली, हे विशेष.

शुश्रूषा ही उपचाराचा अविभाज्य अंग असते. हे मनुष्यबळ तंत्रशुद्ध असावे म्हणून राज्य सरकारने २००६ मध्ये नागपुरच्या मेडिकलमध्ये बी. एससी. अभ्यासक्रम सुरू केला. त्यासाठी परिचर्या परिषदेकडून मंजुरीही मिळविली. मात्र, बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पदभरतीचा विषय निकाली काढण्यात सरकारला अपयश आल्यामुळे २०११ मध्ये परवानगी मिळूनही एमएससी नर्सिंग सुरू करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. 

एम. एस्सी. नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळून नऊ वर्षे झाली तरी या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणासाठी एकही पद न भरले गेल्याने त्याच्या प्रवेशप्रक्रिया दरवेळी संकटात सापडत आहेत. एका बाजूला मनुष्यबळच नसल्याने सरकारी आरोग्य यंत्रणा अत्यवस्थ असताना सरकारचा चालढकलपणा सरकारच्याच अंगलट येण्याची परिस्थिती उद्भवली आहे. 

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत राज्यात नर्सिंग अभ्यासक्रमाच्या बीएससी नर्सिंग पदवीचे प्रशिक्षण देणारी चार शासकीय महाविद्यालये चालविली जातात. पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात ही चालविली जात आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि भारतीय परिचर्या परिषदेने नागपूर येथे एम.एस्सी. अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. 

त्यानुसार नागपूर येथे एम.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमात मेडिकल सर्जिकल, कम्युनिटी हेल्थ, चाइल्ड हेल्थ, सायकियाट्रिक आणि गायनिक ऑबस्ट्रॅटिक या पाच विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली. मात्र पाठपुरावा केल्यानंतरही याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना वारंवार याचा पाठपुरावा करण्यात आला, परंतु तत्कालीन सरकारने या विषयाकडे दुर्लक्ष केले. कोरोनामुळे यावर्षी हा अभ्यासक्रम सुरू होणे शक्य नाही, मात्र आगामी वर्षात मेडिकलमध्ये एमएसस्सी नर्सिंग सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

फेब्रुवारीमध्ये चर्चेला आला विषय

वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले मेडिकल-मेयोच्या समस्या जाणून घेण्यासाठी फेब्रुवारी २०२० नागपुरात आले होते. मेडिकलशी संलग्न बीएसस्सी नर्सिंग महाविद्यालयात २००६ पासून कार्यरत ट्यूटरच्या समस्या १४ वर्षांनंतरही सोडवण्यात आल्या नसल्याची बाब निदर्शनाला आणून दिली. यासोबतच एमएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी चर्चा झाली. येत्या सत्रापासून एमएसस्सी नर्सिंग सुरू करण्याचे संकेत दिले होते, परंतु अद्याप यावर कोणताही कागद पुढे सरकला नसल्याची बाब उजेडात आली.

आजही जैसे थे अशी अवस्था 
एमएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी मुंबईतील सर. जे. जे. ग्रॅंट मेडिकल कॉलेज आणि नागपूरचे मेडिकल यांना एकाचवेळी परवानगी मिळाली. मुंबईच्या जेजेमध्ये एमएससी नर्सिंग सुरू झाले. मात्र विदर्भाचे नव्हे तर मध्य भारताचे आकर्षण असलेल्या मेडिकलमध्ये बीएसस्सी नर्सिंगचा प्रश्न सोडवला नाही. ना मनुष्यबळ, ना इन्फ्रास्ट्रक्‍चर उपलब्ध झाले. यामुळे आजही जैसे थे अशी अवस्था आहे. नऊ वर्षात सुमारे २२५ विद्यार्थी एमएसस्सी नर्सिंगच्या प्रवेशाला मुकले. आगामी वर्षात एमएसस्सी नर्सिंग सुरू व्हावे यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री अमित देशमुख यांना निवेदन देण्यात येईल.
त्रिशरण सहारे, अध्यक्ष-विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी संघटना, नागपूर. 
 
संपादन : अतुल मांगे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com