उपराजधानीत महावितरणची धडक कारवाई: तब्बल १ हजार १६१ थकबाकीदारांना 'शॉक'

योगेश बरवड 
Friday, 12 February 2021

वाढत्या थकबाकीमुळे महावितरणला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती सावरण्यासाठी महावितरणने थकबाकीदारांच्या दिशेने कारवाईचे अस्त्र रोखले आहे.

नागपूर ः थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणने धडक मोहीम आरंभली आहे. त्याअंतर्गत उपराजधानीतील १ हजार १६१ ग्राहकांकडील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीची रक्कम भरा अन्यथा कारवाईला सामोरे जा या भूमिकेवर महावितरण ठाम आहे.

वाढत्या थकबाकीमुळे महावितरणला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती सावरण्यासाठी महावितरणने थकबाकीदारांच्या दिशेने कारवाईचे अस्त्र रोखले आहे. भारतीय जनता पक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समितीने या कारवाईला विरोध दर्शविला होता. यामुळे कारवाई टळू शकेल असा काहीसा समज थकबाकीदारांचा झाला होता. त्याच दरम्यान महावितरणचे कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन बिल भरण्याचे आवाहन करतानाच तातडीने भरणा न केल्यास वीज कापण्याचा इशारा देत होते. 

हेही वाचा - Success Story : एकदाच केली दीड लाखांची गुंतवणूक आता...

हा प्रकार सुरू असतानाच वीज कनेक्शन कापणेही सुरू करण्यात आले. आतापर्यंत १ हजार १६१ थकबाकीदारांकडील वीज कापण्यात आली. कारवाईच्या भीतीपोटी अनेक थकबाकीदार बिल भरण्यासाठी पुढे सरसावू लागले आहेत. त्यातून थकबाकीदारांनी ३ कोटी ७० लाखांचा भरणा महावितरणकडे केला आहे. 

नागपूर शहराचा विचार केल्यास सुमारे ८१ हजार ग्राहकांकडे १६९ कोटींची थकबाकी आहे. कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी कारवाईवर आक्षेप नोंदविला आहे.

हेही वाचा - 'मुलाला भूतबाधा झाली आहे ४ लाख रुपये लागतील...

नागरिकांकडून मुदतवाढीची मागणी

ऊर्जामंत्र्यांनीच यापूर्वी वीजग्राहकांना दिलासा देण्याची भाषा केली. ते वेळोवेळी शब्द फिरवीत राहिले. यामुळेच बिल भरायला विलंब झाला. त्यातच कोरोनामुळे नोकरदार व व्यावसायिक वर्गाचे कंबरडे मोडले. आता मोठी रक्कम एकदाच भरणे शक्य नसल्याने बिलाचा भरणा करण्यासाठी आणखी मुदत दिली जावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEB cut connections of 1161 customers in Nagpur