सिंधू, साईनानंतर नागपूरची मुग्धाच "बेस्ट'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

जागतिक बॅडमिंटन महासंघ प्रत्येक आठवड्याला खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर मानांकन जाहीर करीत असते. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत पी. व्ही. सिंधू सहाव्या तर साईना नेहवाल अकराव्या स्थानावर आहे. यानंतर मानांकनातील भारतीय खेळाडूंत नागपूरची मुग्धा आग्रे हिचा क्रमांक आहे. सध्या ती 73 व्या स्थानावर आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मानांकनात सिंधू, साईनानंतर भारतीय खेळाडूंत मुग्धाचा क्रमांक आहे.

नागपूर : विश्‍वविजेती पी. व्ही. सिंधू, ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती साईना नेहवाल यांच्यानंतर भारतीय बॅडमिंटनमध्ये कोण? असा प्रश्‍न विचारला, तर गुणवत्ता असलेल्या अनेक युवा मुलींची नावे पुढे येतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या मानांकनाचा विचार केल्यास सिंधू, साईनानंतर भारतीय बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत नागपूरकर मुग्धा आग्रे "बेस्ट' असल्याचे सिद्ध झाले आहे.
 
जागतिक बॅडमिंटन महासंघ प्रत्येक आठवड्याला खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर मानांकन जाहीर करीत असते. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत पी. व्ही. सिंधू सहाव्या तर साईना नेहवाल अकराव्या स्थानावर आहे. यानंतर मानांकनातील भारतीय खेळाडूंत नागपूरची मुग्धा आग्रे हिचा क्रमांक आहे.

सध्या ती 73 व्या स्थानावर आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मानांकनात सिंधू, साईनानंतर भारतीय खेळाडूंत मुग्धाचा क्रमांक आहे. एलएडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या मुग्धाचे सर्वोत्तम मानांकन 19 नोव्हेंबर 2019 रोजी 59 असे होते. यापूर्वी अरुंधती पानतावणे ही जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या महिला एकेरी मानांकनात सर्वोत्तम मानांकन मिळविणारी नागपूरची खेळाडू होती. तिने 40 व्या स्थानापर्यंत झेप घेतली होती.

हेही वाचा - पावसाचे पाणी शिरले पाईपमध्ये अन्‌ बाहेर आले हे...

गेल्यावर्षी मुग्धाने तेरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. त्यापैकी घाना येथील स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिने पाच स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. यामुळेच तिला मानांकनात सुधारणा करता आली. जागतिक मानांकनात तिने सुधारणा केली असली तरी भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या मानांकनात मात्र, ती बरीच पिछाडीवर आहे. त्यामुळे जीबी वर्गीस यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर येथील क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या मुग्धाने अखिल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाचा संतुलन करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आपले भारतीय मानांकन सुधारावे यासाठी ती जानेवारी महिन्यात बंगळूर आणि गोवा येथील अखिल भारतीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

क्लिक करा - मुसळधार पाऊस, थंडी अन्‌ ते चौघे, वाचा काय झाले...

सिंधू, साईनानंतर जागतिक मानांकनातील भारतीय खेळाडूंत माझा क्रमांक असल्याचा अभिमान असला तरी ते पुरेसे नाही. मला आणखी झेप घ्यायची आहे. जागतिक मानांकनासोबत भारतीय मानांकनही सुधारायचे आहे आणि हा समतोल यंदा सांभाळण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मुग्धा म्हणाली.

मुग्धा आग्रे
जागतिक मानांकन : 73
भारतीय मानांकन : 52


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mugdha agre international ranking growing in badminton