केवळ 20 मिनिटात मुंबई पोलिसांनी वाचवले कोलकात्याच्या तरूणीचे प्राण... वाचा हा थरार

mumbai police cyber cell special operation
mumbai police cyber cell special operation

नागपूर : पश्‍चिम बंगाल राज्यात राहणाऱ्या 19 वर्षाच्या युवतीने इन्स्टाग्रामवर सुसाईड नोट पोस्ट केली आणि ती चक्‍क मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या हाती लागली. मुंबई पोलिसांनी पश्‍चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने "स्पेशल ऑपरेशन' राबवित केवळ 20 मिनिटात त्या तरूणीचे घर गाठले. आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या युवतीचा पोलिसांनी जीव वाचवला. या घटनेमुळे मुंबई पोलिसांचे कौतूक होत असून या घटनेची दखल गृहमंत्रालयानेसुद्धा घेतली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्‍चिम बंगालमधील कोलकोताजवळील बराकपूर या शहरात राहणारी 19 वर्षीय तरूणी सुमित्रा (बदललेले नाव) कल्याणी विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. तिला सावत्र आई आहे. तिचे एका युवकाशी प्रेमसंबंध होते. त्या युवकाने तिला फूस लावून पळवून नेले होते. मात्र, काही दिवसांनंतर ती आइवडिलाकडे परत आली. मात्र, ती बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्यामुळे संपूर्ण वस्तीत तिची बदनामी झाली. सर्व जण तिला तिरकस नजरेने पाहत होते. तिला टोमणे मारत होते. त्यामुळे तिने होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला.

तिने शनिवारी सुसाईड नोट लिहिली. ती इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. ती सुसाईड नोट एका इंस्टाग्राम युजरने मुंबईतील एका पोलिस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवली. मुंबई पोलिसांनी सतर्कता दाखवत इन्स्टा आयडीवरून तिचा शोध घेतला. मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत कोलकाता पोलिसांशी संपर्क केला व तातडीने त्या मुलीपर्यंत पोहचण्याबाबत विनंती केली. कोलकातामधील बराकपूर आयुक्‍तालयातून सहआयुक्‍तांच्या आदेशाने पीएसआय सत्यजीत मंडळ यांचे पथक रवाना केले.

या पथकाने त्या मुलीचा पत्ता शोधून काढला त्यांनतर तिचे घर शोधून काढले. तिच्या घरासमोर अवघ्या 20 मिनिटांत पोलिस पोहचले. त्यांनी दरवाजा ठोठावला. आतमधून लगेच प्रतिसाद मिळाला. तिच्या वडिलांनी दार उघडले आणि पोलिसांना पाहताच थबकले. पोलिसांनी वेळ न दडवता लगेच मुलीला बाहेर बोलविण्यास सांगितले. काय झाले ? याबाबत सांगण्यापूर्वीच पोलिसांनी मुलीच्या स्टडीरूमचा दरवाजा ठोठावला.

भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या मुलीने दरवाजा उघडला. तिला बाहेर हॉलमध्ये आणले. तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. तिची समजूत घातली आणि समूपदेशनही केले. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोलकातातील एका तरूणीचे प्राण वाचविण्यात आले. पश्‍चिम बंगाल पोलिसांनी लगेच मुंबई पोलिसांना फोन करून धन्यवाद दिले. या घटनेची दखल गृहमंत्रालयानेसुद्धा घेतली, हे विशेष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com