महापालिका आयुक्त मुंढेंनी दिला सत्ताधाऱ्यांना इशारा...काय दिला ते वाचा

अतुल मेहेरे
शनिवार, 27 जून 2020

मुंढे म्हणाले, स्मार्ट सीटीअंतर्गत झालेल्या कामाचे 18 कोटी रुपयांचे जे बिल देण्यात आले, ते काम मी सुरू केले नाही. आधीपासूनच सुरू आहे. ते पैसे द्यावेच लागणार होते. थोडक्‍यात काय तर मी येथे रुजू झाल्यापासून नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आलेला नाही. याची खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.

नागपूर : जीपीएफची रक्कम कुणी भरली नाही 191 कोटी रुपये व त्यावरचे व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करायचे आहे. ते कोणी भरले नाही, कोणाचा दबाव होता, यास जबाबदार कोण? असे अनेक प्रश्‍न आहेत. याची खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे. महापालिकेने 759 कोटी रुपये वसूल केले होते. तीसुद्धा रक्कम सरकारला परत करायची आहे. ती आजवर सरकारला का पाठवली नाही हेसुद्धा एक कोडेच आहे, याकडे लक्ष वेधून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकप्रकारे सत्ताधाऱ्यांना इशाराच दिला आहे.

 

स्मार्ट सीटीअंतर्गत एका कामाचे बिल देण्यासंदर्भात महापौरांनी माझ्यावर जो आरोप लावला, तो धादांत खोटा आहे. आयुक्त हेच कंपनीचे सीईओ असतात. सीईओसंदर्भात काही निर्णय झाला नसेल, तर आयुक्त म्हणून बिलावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार मला आहे. नियमबाह्य रीतीने ठेकेदाराला 18 कोटी रुपये दिले, असे जर कुणाचे म्हणणे असेल, तर सिद्ध करावे, असे आव्हानच महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी "सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांना दिले.

 

अर्धवट माहिती देऊन संभ्रम पसरवू नये

मुंढे म्हणाले, स्मार्ट सीटीअंतर्गत झालेल्या कामाचे 18 कोटी रुपयांचे जे बिल देण्यात आले, ते काम मी सुरू केले नाही. आधीपासूनच सुरू आहे. ते पैसे द्यावेच लागणार होते. थोडक्‍यात काय तर मी येथे रुजू झाल्यापासून नवीन ठेकेदार नियुक्त करण्यात आलेला नाही. 2012 पासून ते काम सुरू आहे. या कामाचा ठेका हा 550 कोटी रुपयांचा आहे. यापूर्वीही (तेव्हा मी येथे आयुक्त नव्हतो) या कामाचे बिल देण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत "मर्जितल्या ठेकेदाराला 18 कोटी रुपये दिले', असे कुणी कसे काय म्हणू शकते. ते रनिंग बिल होते. मी नाही माझ्या जागी कुणीही आयुक्त म्हणून असते, तर त्यांना ते बिल अदा करावे लागले असते. आरोप करणाऱ्यांनी कोणता निधी कोणत्या खात्यात वर्ग करून चुकीचे काम केले, हेसुद्धा सांगावे. अर्धवट माहिती पसरवून संभ्रम निर्माण करू नये.

जाणून घ्या : पोलिसांनी केला त्याचा धूम स्टाईल पाठलाग! अखेर जेरबंद

प्रत्येक प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न

शासनाच्या वतीने काम करण्याची जबाबदारी माझी आहे. कायद्यांत जो रोल ठरवून दिलेला आहे, तोच मी निभावतो. काम करताना प्रामाणिकपणे स्वतःला त्या भूमिकेत झोकून देतो. जबाबदारीच्या भूमिकेशी सुसंगत ठरेल, असाच वागतो. लोकहितासाठी आणि जेथे असेल त्या शहराच्या विकासासाठी काम करतो. त्यामुळे आकसापोटी कुणी कितीही प्रयत्न केले; तरीही मला माझ्या भूमिकेपासून दूर करू शकणार नाही. राहिला सीईओ पदाबाबतचा प्रश्‍न, तर हा बोर्ड ऑफ डायरेक्‍टरचा विषय आहे, त्याबाबत मी आता भाष्य करणार नाही. याबाबत बैठकीतच संबंधितांना उत्तर देणार आहे. येथे काहीच नसलेल्या गोष्टीही "प्रकरण' म्हणून काढण्यात येत आहेत आणि प्रत्येक प्रकरणाला वेगळा रंग देण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mundhe Warned NMCs rulling leaders