लॉकडाऊनच्या काळात लागली सॅनिटायझरची लत, परंतु आता भोगावे लागले गंभीर परिणाम... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

गौतम गोस्वाम महापालिकेत रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. ते पत्नी व मुलासह राहत होते. त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. पण, लॉकडाऊनमध्ये त्यांना दारू मिळत नव्हती. त्यावेळी दारूला पर्याय म्हणून त्यांनी सॅनिटायझरची निवड केली.

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात दारूबंदीमुळे दारू मिळत नसल्याने अनेक दारुड्यांनी सॅनिटायझरचा पर्याय निवडला होता. त्यावेळी जागोजागी विक्री होत असलेल्या सॅनिटायझरवर अनेकांनी आपले दारूचे व्यसन पूर्ण केले. दारूच्या आहारी आकंठ बुडालेल्या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यानेही अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर पिऊन नशा करण्याचा प्रयत्न केला. गौतम बिसेन गोस्वामी (45) रा. गुजरनगर, गंगाबाई घाट, असे त्यांचे नाव असून, दारूला पर्याय म्हणून सॅनिटायझर प्राशन करणाऱ्या गौतम यांना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम गोस्वाम महापालिकेत रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. ते पत्नी व मुलासह राहत होते. त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. पण, लॉकडाऊनमध्ये त्यांना दारू मिळत नव्हती. त्यावेळी दारूला पर्याय म्हणून त्यांनी सॅनिटायझरची निवड केली. थोडी थोडकी का होईना पण नशा येत असल्याने त्या दोन महिन्यांच्या काळात सॅनिटायझरला दारू मानून व्यसन पूर्ण केले. 

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...

कालांतराने दारूऐवजी सॅनिटायझरचे व्यसन लागल्याने ते नियमित तेच घ्यायचे. निरंतर सॅनिटायझर पिल्याने 21 जून रोजी त्यांची प्रकृती बिघडली. रात्री 9.30 वाजता त्यांच्या मुलाने त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात केले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, रविवारी संध्याकाळी 6 वाजता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. 

पोलिस उपनिरीक्षक पी. एम. लाकडे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, त्यांनी किती प्रमाणात सॅनिटायझर पिले, सॅनिटायझरची बाटली व त्यात कोणती रसायने होती, यादृष्टीने तपास करण्यात येणार असल्याची माहिती लाकडे यांनी दिली. 
 

छतावरून पडून मुलीचा मृत्यू 

घराच्या छतावर मुलांसोबत खेळत असलेली 11 वर्षीय मुलगी अचानक तोल जाऊन खाली पडली. डोक्‍याला गंभीर मार लागल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मिरचीबाजार परिसरात घडली. आशू गजानन खाटे (11, मिरची बाजार, एमआयटी बिल्डिंग) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 23 जून रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आशू सक्करदरा हद्दीतील एनआयटी बिल्डिंग, फ्लॅट नं. 303, मिरची बाजार, नागपूर येथे बिल्डिंगमधील काही मुलांसोबत घराच्या छतावर खेळत होती. अचानक तिने पॅराफिटच्या भिंतीवरून खाली बघण्याचा प्रयत्न केला. तिचा तोल गेल्याने ती खाली पडून डोक्‍याला मार लागून जखमी झाली. तिला उपचाराकरीता श्री हॉस्पिटल येथे भरती केले. त्यानंतर मेडिकल हॉस्पिटल येथे रेफर करून तेथे भरती केले, पण 28 जून रोजी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal cleaning worker dies after drinking sanitizer