मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढला नागरिकांसाठी आणखी एक आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जून 2020

पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा वापर केल्यास जीवित व वित्तहानी होण्याची शक्‍यता आहे. धोकादायक इमारतीतून तत्काळ बाहेर पडा, असे आवाहन करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज राहण्यास अयोग्य इमारती निष्कासित करण्याबाबत नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

नागपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही कठोर निर्णय घेत आदेश काढले. त्यामुळे मनपातील सत्तापक्षासोबतच विरोधकही नाराज झाले. नागरिकांनी मात्र मुंढे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. आता पावसाळ्यातील धोका लक्षात घेता मनपा आयुक्तांनी नागरिकांना इशारा देत नवीन आदेश काढला आहे.

पावसाळ्यात धोकादायक इमारतीचा वापर केल्यास जीवित व वित्तहानी होण्याची शक्‍यता आहे. धोकादायक इमारतीतून तत्काळ बाहेर पडा, असे आवाहन करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज राहण्यास अयोग्य इमारती निष्कासित करण्याबाबत नोटीस बजावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. नोटीसनंतर 15 दिवसांत घर खाली न केल्यास रहिवाशांना पोलिसांकडून बाहेर काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती असून हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन निवास करीत असल्याबाबत "सकाळ'ने 17 मे रोजी ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धोकादायक इमारतीच्या वापराबाबत रहिवाशांना इशारा व प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले.

वाचा - सावधान! मास्क न वापरल्यास भारावा लागेल दंड

धोकादायक इमारतीमुळे अपघात घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित इमारत किंवा घर मालकाची राहील, असेही त्यांनी बजावले. सर्वेक्षणात राहण्यास अयोग्य आढळलेले अतिधोकादायक घरे व इमारतींना तत्काळ निष्कासित करण्याबाबत नोटीस द्या, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. नोटीसनंतर 15 दिवसांत घर खाली न केल्यास रहिवाशांना पोलिसांकडून काढून टाकण्याची कारवाई केली जाईल. याशिवाय स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यास टाळाटाळ करीत असलेल्या मालकावर 25 हजार रुपये किंवा संबंधित इमारत किंवा घराचे वार्षिक मालमत्ता कराची रक्कम, यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढ्या रक्कमेचा दंड ठोठावण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

आणखी वाचा - नागपूर तसेच विदर्भातील आजची प्रत्येक बातमी फक्त सकाळवर

173 इमारती जीर्ण
शहरात विविध प्रवर्गाच्या इमारतींचे झोननिहाय सर्वेक्षण करण्यात आले. यात एकूण 173 इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे आढळून आले. राहण्यास अयोग्य व तत्काळ निष्कासित करावयाच्या 97 इमारती आढळल्या आहेत. याशिवाय इमारत रिकामी करून दुरुस्ती करावयाच्या 25, इमारत रिकामी न करता दुरुस्ती करावयाच्या 35 इमारती आणि किरकोळ दुरुस्तीची गरज असलेल्या 16 इमारती आहेत.

स्ट्रक्‍चरल ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करा
30 वर्षापेक्षा अधिक काळ झालेल्या इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट मनपाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंता किंवा स्ट्रक्‍चरल ऑडिट अभियंत्याकडून करणे अनिवार्य आहे. मनपाने नेमलेल्या स्ट्रक्‍चरल ऑडिट अभियंत्याकडून शिफारस केलेली दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मनपाच्या संबंधित झोन कार्यालयात सादर करावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले.

अवश्य वाचा - चुलतभावाच्या मनात करणी केल्याच्या संशयाचे भूत...मग पुतण्यावर केले कोयत्याने वार

संपर्क साधण्याचे आवाहन
शहरातील एखाद्या इमारतीचा भाग मोडकळीस आल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सूचना झोन कार्यालयाला द्यावी. मनपाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात येईल. अपघात झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षामधील 0712-2567029, 2567777, 7030972200 किंवा 101 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन मनपाने केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner Tukaram Mundhe issued order for dangerous buildings