'मुख्यमंत्री साहेब, उपराजधानीला पाचशे कोटी द्या'

राजेश प्रायकर
Friday, 25 September 2020

मागील युती सरकारने महापालिकेचे जीएसटी अनुदान ५३ कोटींवरून ९३.३४ कोटी केले होते. एवढेच नव्हे प्रलंबित विशेष अनुदानाचे ३०० कोटीही मिळाले होते. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक गाडा रुळावर आला होता.

नागपूर  ः महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असून विकासकामांसह अत्याधुनिक आरोग्य सेवा उभारणीसाठी पाचशे कोटी रुपयांचे विशेष अनुदान द्या, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. महापालिकेच्या स्थितीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतनही लांबत असून, पुढील काही महिन्यांत यापेक्षाही वाईट स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मागील युती सरकारने महापालिकेचे जीएसटी अनुदान ५३ कोटींवरून ९३.३४ कोटी केले होते. एवढेच नव्हे प्रलंबित विशेष अनुदानाचे ३०० कोटीही मिळाले होते. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक गाडा रुळावर आला होता. परंतु युती सरकार गेले, त्यानंतर कोरोना विषाणूचे संक्रमण वाढल्याने लॉकडाउनच्या काळात राज्य सरकारने जीएसटी अनुदानात ४३ कोटींची कपात केली. गेल्या सहा महिन्यात अडीचशे कोटी रुपये महापालिकेला कमी मिळाले. 

सविस्तर वाचा - ही लक्षणं देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना; हे उपाय करा आणि मिळवा नैसर्गिक ऑक्सिजन
 

यातून महापालिकेची गाडी रुळावरून घसरली. त्यामुळे विकास कामे खोळंबली. पुढील काही महिनेही महापालिकेच्या या स्थितीत सुधारणेची शक्यता नाही. त्यामुळे आतापर्यंत अर्थसंकल्प देण्याच्या तयारीत असलेले स्थायी समिती अध्यक्षांना यंदाच्या अंदाजपत्रकात जवळपास पाचशे कोटींच्या योजनांना किंवा नव्या योजना आणण्याच्या इच्छेवर पाणी फेरावे लागणार आहे. 

एकूण स्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पाचशे कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी केली. कोविडच्या काळातच नव्हे तर शहरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेसह रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

 
कोवीडमुळे घटले उत्पन्न
यावर्षी कोविडचा प्रादुर्भाव असल्याने महापालिकेला मालमत्ता कर, पाणी करासह सर्व स्रोतातून उत्पन्न घटले आहे. शहरातील विकास कामे करायची असून, अत्याधुनिक आरोग्यसेवेची उभारणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे पाचशे कोटींची मागणी केली. उपराजधानीची गरज लक्षात घेता मुख्यमंत्री सहकार्य करतील, असा विश्वास आहे.
- पिंटू झलके, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका.
 
संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation Standing Committee Chairman demands Rs. 500 crore to Chief Minister