जेवणावरून झाला दोघांत वाद; क्‍लिनरने केला क्षणार्धात "खेळ खल्लास'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020


उत्तरप्रदेशातील आजमगढ येथून "ते' दोघेही केबलचा ट्रक घेउन चेन्नईकडे निघाले. प्रवास लांबचा असल्यामुळे दमलेल्या ट्रक चालकाने ढाब्यावर ट्रक थांबविला. क्‍लिनरसोबत दोघेही जेवण करीत असताना चालकाने क्‍लिनरला जेवणावरून हटकले. बस्स एवढयाशा कारणावरून वीस वर्षिय क्‍लिनर रागाने लाल झाला आणि, त्याने क्षणार्धात....

पाटणसावंगी (जि.नागपूर) : उत्तरप्रदेशातील आजमगढ येथून केबल घेउन चेन्नइेला जात असताना रस्त्यात पाटणसावंगी येथे जेवण करण्याच्या उद्‌देशाने ट्रक चालक व क्‍लिनर दोघे थांबले. रात्री ढाब्यावर जेवत असताना त्यांच्यात जेवणावरून वाद झाला. चालकावर असलेल्या रागातून क्‍लिनरने थेट लोखंडी पान्हा चालकाच्या डोक्‍यावर हाणला आणि त्याचा "खेळ खल्लास' केल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान पाटणसावंगी येथील सद्‌भावना नगरजवळ घडली.

नक्‍की हे वाचा : "ते' दोघे पती-पत्नी दुचाकीवर जात होते घराकडे, रस्त्यातच कशा तुटल्या जन्माच्या गाठी...

दोघेही उत्तरप्रदेशचे रहिवासी
मृत चालकाचे नाव उदयनारायण मनोहर यादव(वय36, नागरिया, डाहानपूर, उत्तर प्रदेश)असे आहे. त्याच्याच ट्रकवरील आरोपी क्‍लीनर छोटू शिवनाथ प्रजापती (वय20, जहॉंपीर, आजमगढ, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. ट्रक (क्रमांक जीजे12 बीटी3206) आजमगड येथून चेन्नई येथे केबल ड्रम घेऊन जात असताना महामार्गावरील सद्‌भावना पाटणसावंगी येथील सर्व्हिस रोडवर सोमवारी ते दोघे जेवण करण्यासाठी थांबले. जेवण करीत असताना चालक व क्‍लिनर यांच्यात शाब्दिक वाद झाला. क्‍लीनरने रागाच्या भरात चालकाच्या डोक्‍यावर गाडीच्या केबिनमध्ये ठेवलेल्या लोखंडी पाणा काढून चालक उदयनारायण यादव याच्या डोक्‍यावर हाणला. त्यानंतर क्‍लिनरने त्याला ट्रकखाली ढकलून ठार केले व आरोपी क्‍लिनर पसार झाला.

हेही वाचा : घर चालवावे की पिकावर खर्च करावा, शेतक-यांना पडला प्रश्‍न

महिलेला आढळला मृतदेह
मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान सद्‌भावना नगरासमोर असलेल्या ढाब्यावरील महिला रेखा पृथ्वीराज कश्‍यप (रा.पाटणसावंगी) यांना ट्रकचालक ट्रकच्या बाजूला मृतावस्थेत पडलेला दिसला. तिने स्थानिक पोलिस चौकीला माहिती दिली. रात्री आरोपी हा ढाब्यावर आल्याची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आरोपीचा शोध घेऊन पाटणसावंगी टोल नाक्‍याजवळ त्याला पकडून अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक अशोक कोळी, पोलिस सहाय्यक निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, हेमराज कोल्हे पुढील तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a truck driver over a meal dispute