
शनिवारी रात्री दीप्तीने पतीच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग ऐकली. त्यातून तिला एका युवतीशी अनैतिक संबंध असल्याचे कळले. १३ तारखेला दिप्तीने भाऊ शुभमला कॉल केला आणि पतीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती दिली. १४ फेब्रुवारीला सकाळी शुभम बहिणीला फोन केला असता ती उत्तर देत नव्हती.
नागपूर : जगभरात प्रेमदिवस म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा होत असतानाच नागपुरात प्रेयसीचे प्रेम मिळविण्यासाठी पतीने पत्नीचा खून केला. हे थरारक हत्याकांड सोमवारी पहाटे उघडकीस आले. दीप्ती अरविंद नागमोती (वय २६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अरविंद अशोक नागमोती (वय ३०, रा. भीमनगर, ईसासनी) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद नागमोती हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील उदापूर येथील रहिवासी आहे. तो हिंगण्यातील एका खासगी कंपनीत वेल्डर पदावर कार्यरत आहे. त्याचे ५ जानेवारी २०२१ रोजी कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील नातेवाईक असलेल्या दीप्ती नावाच्या युवतीशी लग्न झाले होते. दोन आठवड्यांपूर्वीच दोघेही पती-पत्नी ईसासनीतील भीमनगरात किरायाने राहायला आले होते.
अरविंदचे लग्नापूर्वीच वस्तीत राहणाऱ्या एका युवतीशी अनैतिक संबंध होते. दोघांचे संबंध अगदी घट्ट असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, युवतीच्या आई-वडिलांनी लग्नास विरोध केल्यामुळे लग्न होऊ शकले नाही. त्यामुळे नाइलाजास्तव त्याला दीप्तीशी लग्न करावे लागले. लग्नानंतर अरविंदची घरातील वागणूक व्यवस्थित नव्हती. तो नेहमी कुण्यातरी युवतीशी तासनतास फोनवर बोलत होता. दीप्तीने विचारल्यास मैत्रीण असल्याचे सांगत होता.
शनिवारी रात्री दीप्तीने पतीच्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग ऐकली. त्यातून तिला एका युवतीशी अनैतिक संबंध असल्याचे कळले. १३ तारखेला दिप्तीने भाऊ शुभमला कॉल केला आणि पतीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती दिली. १४ फेब्रुवारीला सकाळी शुभम बहिणीला फोन केला असता ती उत्तर देत नव्हती.
तर जावई अरविंदसुद्धा फोन उचलत नव्हता. त्यामुळे शुभमला संशय आला. त्याने नातेवाईक आणि अरविंदच्या वडिलांसह नागपूर गाठले. घराला बाहेरून कडी लागलेली होती. दार उघडून आत गेले असतात दिप्तीचा मृतदेह पलंगावर पडलेला दिसला. त्यांनी लगेच पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी अरविंदविरुद्ध हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे.
पाच जानेवारीला मोठ्या थाटामाटात दीप्ती आणि अरविंदचे लग्न झाले होते. त्यांनी नुकताच ईसासनीतील भीमनगरात किरायाने रूम घेऊन संसार थाटला होता. संसाराला सुरवात होताच पतीच्या प्रेयसीने ‘एंट्री’ घेतली. त्यामुळे सुखी संसाराला गालबोट लागले. पतीचे अनैतिक संबंध माहिती होताच पत्नीचा अडसर दूर केला.
१४ फेब्रुवारी रोजी दिप्तीचा वाढदिवस होता. नव्यानेच लग्न झाल्यामुळे घरात पतीकडून वाढदिवस आणि व्हॅलेंटाइन गिफ्ट मिळणार याची दीप्ती वाट पाहत होती. मात्र, अरविंदने आपल्या प्रेयसीला दिलेला शब्द पाळण्यासाठी पत्नीचा डोक्यावर जड वस्तू मारून खून केला. दिप्तीच्या नाकातून रक्त निघत होते तर चेहरा काळवंडला होता.