सहा महिन्यांपूर्वी केला प्रेमविवाह आणि आता झाले असे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

धीरज साळवे हा मूळचा कुही तालुक्‍यातील वरंभा या गावाचा रहिवासी आहे. तो ट्रकचालक असून गेल्या सहा महिन्यांपासून नागपुरात राहतो. त्याचे सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला आहे. अज्ञात आरोपीने रात्रीच्या सुमारास त्याचा गळा आवळून हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

नागपूर : लकडगंज परिसरातील मालधक्‍का भागात एका 30 वर्षीय युवकाचा बेदम मारहाण केल्यानंतर गळा आवळून खून करण्यात आला. ही थरारक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. धीरज ऊर्फ भोला भगवान साळवे (वय 30, रा. गरोबा मैदान, नागपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज साळवे हा मूळचा कुही तालुक्‍यातील वरंभा या गावाचा रहिवासी आहे. तो ट्रकचालक असून गेल्या सहा महिन्यांपासून नागपुरात राहतो. त्याचे सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झाला आहे. अज्ञात आरोपीने रात्रीच्या सुमारास त्याचा गळा आवळून हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याचा एक पायसुद्धा तुटलेल्या अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हिवरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. 

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनाकरिता मेयो रुग्णालयात रवाना केला. शवविच्छेदन अहवालानंतर तपासाला अधिक गती येणार असून सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. हा कुणी, आणि का केला, याबाबत पोलिस माहिती काढत आहेत. 

गावात झाला होता वाद 
धीरज साळवे याचे नागपुरातील एका युवतीवर प्रेम होते. त्याने प्रेयसीच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांच्या परवानगीने "लव्ह कम अरेंज मॅरेज' केले. गेल्या आठ दिवसांपूर्वी पती-पत्नी वरंभा गावी गेले होते. तेथे गावातील चार युवकांसोबत भांडण आणि हाणामारी झाली होती. तो वाद मौदा पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला होता. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. 

हेही वाचा : ...अन्‌ बॉयफ्रेंड सुसाट पळाला; लॉकडाउनमध्ये प्रेमियुगुलांची आफत

धीरज जुगाराचा शौकीन 
ट्रकचालक असलेल्या धीरजला जुगाराचा शौक होता. त्यामुळे तो अनेक ठिकाणी जुगार खेळायला जात होता. जुगारातील हार-जीतच्या पैशावरून वाद झाल्यानंतर गेम केल्याचा संशय पोलिसांना आहे. धीरजच्या उजवा पायाचे हाड मोडलेले आहे तर त्याचा गळ्यावर दोरीने आवळल्याचा खुणा आहेत. कुण्यातरी ओळखीच्या आरोपींनी हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a youth