तंबाखू आणि दारूच्या नादात गेला जीव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

जल्या आणि पुरुषोत्तमने दारू परत देण्यास नकार दिला. त्यावरून तिघांमध्ये वाद झाला. तिघेही दारू पिऊन असल्यामुळे जिद्दीला पेटले. भांडणात दारूची बाटली खाली पडली आणि फुटली. त्यामुळे जल्या आणि पुरुषोत्तमचा पारा चढला. त्यांनी त्या युवकाचा दगडाने ठेचून खून केला आणि पळ काढला.

नागपूर : तंबाखूच्या बदलेल्या दिलेली दारूची बाटली परत घेतल्यामुळे तिघांमध्ये वाद झाला. या वादात दारूची बाटली हातातून खाली पडल्याने फुटली. पोटात जाण्याऐवजी दारू जमिनीवर पडल्यामुळे संतापलेल्या दोघांनी एकाचा दगडाने ठेचून खून केला. हे हत्याकांड कापसी परिसरात गुरुवारी घडले होते. 

या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पारडी पोलिसांनी अटक केली. जल्या ऊर्फ सहदेव कावळे (वय 35, नवरगाव, रामटेक) आणि पुरुषोत्तम सूरजप्रसाद विश्‍वकर्मा (वय 38, रा. रा. सिहोरा, जबलपूर-मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. ज्या युवकाचा खून झाला, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जल्या आणि पुरुषोत्तम हे दोघेही एका ढाब्यावर काम करतात. त्यांना दारूचे व्यसन आहे. गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ते दोघेही कापसी पुलाजवळ बसलेले होते. त्यांनी दारू ढोसलेली होती. 

दरम्यान, एक युवक त्यांच्याकडे आला. त्याच्या हातात दारूच्या दोन बाटल्या होत्या. त्याने जल्याला तंबाखू मागितला. मात्र, जल्याने तंबाखू देण्यास नकार दिला. त्यावर त्याने तंबाखूच्या बदल्यात दारूची एक बाटली देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे जल्याने त्याला तंबाखू दिला. तो युवक त्यांच्या बाजूलाच बसून दारू पित बसला. दरम्यान, तो पुन्हा या दोघांकडे आला. त्याने दारूची बाटली परत मागितली. परंतु, जल्या आणि पुरुषोत्तमने दारू परत देण्यास नकार दिला. त्यावरून तिघांमध्ये वाद झाला. तिघेही दारू पिऊन असल्यामुळे जिद्दीला पेटले. भांडणात दारूची बाटली खाली पडली आणि फुटली. त्यामुळे जल्या आणि पुरुषोत्तमचा पारा चढला. त्यांनी त्या युवकाचा दगडाने ठेचून खून केला आणि पळ काढला. दुसऱ्या दिवशी पारडी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविला. 
  
हेही वाचा : ...अन्‌ बॉयफ्रेंड सुसाट पळाला; लॉकडाउनमध्ये प्रेमियुगुलांची आफत
 

असा लागला छडा 
मृत युवक हा परप्रांतीय मजूर असावा, असा अंदाज पोलिसांनी लावला. त्याचा फोटो सर्व पोलिस ठाणी आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक नागरिकांना दाखविला. हाताला जळल्याची जखम असलेल्या व्यक्‍तीसोबत हा युवक बोलत उभा होता, एवढी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि जळलेला हात असलेल्या युवकाचा शोध घेतला. तो युवक म्हणजे सहदेव कावळे असून, मेडिकल चौकात राहायला गेल्याचे पोलिसांना कळले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या साथीदार पुरुषोत्तमलाही अटक केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a youth for alcohol