त्यांना कळतो केवळ माणुसकीचा धर्म; ज्याच्या त्याच्या धर्मानुसार देतात अंतिम निरोप

केवल जीवनतारे 
Friday, 25 September 2020

कोरोनामुळे मरणानंतरही शवाची फरफट सुरू असते. अशाच एका अंत्यसंस्काराच्या वेळी निर्माण झालेल्या घटनेने मन हेलावले आणि या संघटनेचे सचिव जावेद अखतर, माजी नगरसेवक सिराज अहमद यांनी पुढाकार घेत कोरोनामुळे मृत मुस्लिमांच्या दफनविधीसाठी पुढाकार घेतला. 

नागपूर : कोरोनाच्या विळख्यात माणुसकी हरवली आणि मृत्यूनंतर शवांच्या नशिबी विटंबना येऊ लागली आहे. घरी दगावलेल्यांसाठीही चार खांदे उपलब्ध होत नसताना मुस्लिम बांधवांनी माणुसकी जपत कोरोनाच्या युद्धजन्य परिस्थितीत सर्व धर्मातील दोनशेवर शवांचे त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार केले. गेल्या पाच महिन्यांपासून जमियत उलेम ए हिंद या संघटनेशी जुळलेल्या मस्लिम बांधवांकडून अंत्यसंस्काराचे काम अखंडपणे सुरू आहे.

मेयो-मेडिकलसह खासगी रुग्णालयात कोरोनाने निधन झाल्यानंतर शव नातेवाईकांच्या स्वाधीन केले जात नाही. शवाचे पोस्टमार्टमही होत नाही. कोरोनामुळे मरणानंतरही शवाची फरफट सुरू असते. अशाच एका अंत्यसंस्काराच्या वेळी निर्माण झालेल्या घटनेने मन हेलावले आणि या संघटनेचे सचिव जावेद अखतर, माजी नगरसेवक सिराज अहमद यांनी पुढाकार घेत कोरोनामुळे मृत मुस्लिमांच्या दफनविधीसाठी पुढाकार घेतला. 

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

मृत्यूचा टक्का वाढल्यानंतर महापालिकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार करणे शक्य नव्हते. यामुळे हिंदू असो वा ख्रिश्चन, बौद्ध असो वा आदिवासी या साऱ्यांवर अंतिम विधी करण्यासाठी या मुस्लिम बांधवांनी मदतीचा हात पुढे केला. घरच्याच्या निधनाचे दु:ख असताना अंत्यसंस्कारासाठी अनेकांकडे पुरेसे पैसे नसतात. अशावेळी काही मदतही करण्यात येते. कोरोना मृत्यूनंतर कोणीही मदतीला समोर येत नाही. त्यांना बिकट काळात संघटेनेच जावेद अख्तर यांनी धीर दिला. रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.

ख्रिश्चन धर्मातील ८ ते १० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी यांच्या धर्मातील विधीची माहिती करून घेतली. मृत्यूनंतर शवपेटीत शव ठेवण्यापासून तर फादरद्वारे वाचला जाणारा शोक संदेश याची संपूर्ण माहिती करून घेतली. त्यानंतर ख्रिश्चन धर्मातील ८ ते १० जणांवर अंत्यसंस्कार केले. त्याचप्रमाणे हिंदू समाजातील पन्नासपेक्षा अधिक शवांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. बौद्धांच्याही काही पार्थिवावर त्यांनी अंत्यसंस्कार केले. ख्रिश्चन धर्मातील व्यक्तींवर त्यांच्या स्मशानभूमीत तर मुस्लिमांवर कबरस्तानामध्ये अंत्यसंस्कार केले. या मुस्लिम बांधवांनी समाजापुढे एकतेचे अनोखे उदाहरण ठेवले आहे.

 

तरच कोरोनाची लढाई आपण जिंकू
हा देश माझा आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात असावी. सर्व जाती धर्मांनी परस्परांच्या मदतीसाठी पुढे येण्याची आज खरी गरज आहे. तसे झाले तरच कोरोनाची लढाई आपण जिंकू शकू. अंतिम संस्कारांसाठी साऱ्यांनीच मदत केली. संघटनेतील प्रत्येकाने आपल्यातील माणुसकीचा परिचय संकटकाळात दिला. त्या सर्वांचे आभार.
- जावेद अख्तर, सिराज अहमद, जमियत उलेमा, नागपूर. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslim brothers Funerals the death body of Corona patients