कुठे गेला नाग नदी सौंदर्यीकरणाचा "फ्रेंच मॉडेल'?

Nag River beautification's French model disappeared
Nag River beautification's French model disappeared

नागपूर : फ्रान्सच्या एएफडी संस्थेने नाग नदी सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार करून महापालिकेकडे सोपविला. परंतु, वर्षभरापासून हा आराखडा धूळखात पडला असल्याचे चित्र आहे. 1600 कोटींचा शहराचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पालाही अधिकाऱ्यांच्या उदासीनतेची कीड तर लागली नाही ना, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित झाला आहे. 


फ्रान्सच्या एएफडीने आंतरराष्ट्रीयस्तरावरील नद्यांच्या सौंदर्यीकरणाचा अभ्यास केला. मागील वर्षी वनामती सभागृहात महानगरपालिका, महामेट्रो, व्हीएनआयटी, नीरी, सामाजिक संस्था, नागपूर सुधार प्रन्यास, वन विभाग, कृषी विद्यापीठ, स्मार्ट सिटी, एनईएसएल व इतर भागधारकांशी चर्चा करून आराखड्यात सौंदर्यीकरणाच्या कामाचे प्राधान्य ठरविण्यात आले. पूर व्यवस्थापन, गतिशीलता, पुनर्वसन, जैवविविधता, पर्यावरण व वेगवेगळ्या विभागाचे समन्वयन याबाबत चर्चा करून नाग नदी सौंदर्यीकरणाचा आराखडा तयार केला.

हा आराखडा मागील वर्षी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या सुपूर्द करण्यात आला. 17 किमी नाग नदी किनाऱ्यावरील 50 हेक्‍टर जागेचा कायापलट करण्याचे प्रस्तावित आहेत. विशेष म्हणजे, हा परिसर हिरवळयुक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. नाग नदी किनाऱ्यावरील आठ ठिकाणी उद्यान आदी सौंदर्यीकरणाची कामे करण्यात येणार असून यात अंबाझरी परिसरात नाग नदी माहिती केंद्रासोबतच पायी फिरण्यासाठी ट्रॅक आदीही तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यांनी पुढाकार घेत सर्वप्रथम नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पासाठी जपानच्या "जिका' या संस्थेकडून सहाय्यही मिळवले. परंतु, नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पच सुरू न झाल्याने नाग नदी सौंदर्यीकरणाचा फ्रेंच मॉडेलही अडगळीत गेल्याचे चित्र आहे. 

 काय आहे आराखड्यात 
- 17 किमी किनाऱ्याचे सौंदर्यीकरण 
- किनाऱ्यावरील 50 हेक्‍टर जागेचा कायापालट 
- किनाऱ्याच्या दोन्ही बाजूंना 15 मीटरपर्यंत गर्द हिरवाई 
- 10 किमीचा सायकल ट्रॅक 
- हेरिटेज ट्रेल अर्थात पायी चालण्यासाठी रस्ता 

 प्रकल्पाची किंमत 
नाग नदी सौंदर्यीकरण ः 1600 कोटी 
प्रदूषण निर्मूलन प्रकल्प ः 1252 कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com