नागपूर ब्रेकिंग : उपराजधानीत कोरोनास्फोट, एकाच दिवशी आढळले 85 बाधित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जून 2020

30 एप्रिल रोजी शहरात कोरोनाबाधितांची संख्या केवळ 139 होती. मात्र अवघ्या 40 दिवसांमध्ये शहरात 733 कोरोनाबाधितांची भर पडली. मोमीनपुरा परिसरात आतापर्यंत 242 कोरोना बाधितांची नोंद झाली.

नागपूर : उपराजधानी सामुदायिक प्रादुर्भावाच्या उंबरठ्यावर आल्याचे चित्र आहे. नाईक तलाव परिसरात जंगी पार्टी झाली. यातून या वस्तीमध्ये कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचा अनुभव बुधवारी आला. नाईक तलाव, बांगलादेश येथून बुधवारी पहिल्या टप्प्यातील तपासणीतून 61 तर दुसऱ्या टप्प्यातील तपासणीतून 24 जणांना कोरोनाने विळख्यात घेतले. मोमीनपुऱ्यानंतर शहरातील संवेदनशील हॉटस्पॉट म्हणून नाईक तलाव-बांगलादेशची नोंद झाली. यापूर्वीचा सतरंजीपुरा हॉटस्पॉट मागे पडला. एकाच दिवशी 85 बाधित आढळल्याने उपराजधानीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून, रुग्णसंख्या 862 वर गेली.

गडचिरोली : नक्षलवाद्यांची वनरक्षकांना बेदम मारहाण, वनविभागाचे कार्यालयही जाळले

विशेष असे की, 30 एप्रिल रोजी शहरात कोरोनाबाधितांची संख्या केवळ 139 होती. मात्र अवघ्या 40 दिवसांमध्ये शहरात 733 कोरोनाबाधितांची भर पडली. मोमीनपुरा परिसरात आतापर्यंत 242 कोरोना बाधितांची नोंद झाली. तर नाईक तलाव-बांग्लादेश परिसराने दिडशेचा टप्पा गाठला.

यानंतर सतरंजीपुरा येथे 115 कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष असे की, पश्‍चिम नागपुरातील शिवाजीनगर येथील 28 वर्षीय युवतीलाही कोरोनाची बाधा झाल्यामुळे शिवाजीनगर परिसर सील करण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी कोरोनारुग्णांची संख्या सहाशेवर होती. मात्र, आता हा आकडा चक्क 864 वर पोहचला आहे. नागपूर शहराने आता अकोल्यावरही मात केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

 

24 तासांत 126 पार

शहरात मागील 24 तासांमध्ये 125 कोरोनाबाधितांची भर पडली. बुधवारी पशुवैद्यक प्रयोगशाळेतून आलेल्या नवीन बाधितांमध्ये सारेच्या सारे कोरोनाबाधित नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरातील असल्याने या भागातील सर्व वस्त्यांना सील ठोकण्यात आले. नागपूर जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 845 वर पोहचली. एम्समध्ये 50 रुग्ण उपचार घेत आहेत. मेयोत 82 तर उर्वरित 104 रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. याच गतीने रुग्ण बरे होत असल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.
तीन महिन्यात 525 जणांनी कोरोनावर मात केली.

शहरातील हे आहेत हॉटस्पॉट

  • मोमीनपुरा : 242
  • नाईक तलाव बांग्लादेश : 160
  • सतंरजीपुरा: 114
  • टिमकी भानखेडा: 51
  • खलाशी लाईन : 25
10 दिवसांतील कोरोनाबाधितांची वाढ  
तारीख बाधित
1 जून 19
2 जून 24
3 जून 19
4 जून 12
5 जून 56
6 जून 16
7 जून 16
8 जून 31
9 जून 42
10जूनः 85

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nagpur 85 corona Patients were found on the same day