
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रकोप उपराजधानीत गुणाकार पद्धतीने वाढत आहे. झोपडपट्टयांमध्ये कोरोना शिरत असून, मंगळवारी आणखी 11 रुग्णांची भर पडली. यामुळे रुग्णसंख्या 1076 वर गेली असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे. याशिवाय कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढत आहेत. शुक्रवार, 12 जूनला कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर लगेच तीन दिवसानंतर सोमवारी (ता.15) आणखी एका पन्नास वर्षीय व्यक्तीचा कोरोनाच्या बाधेने सकाळी मृत्यू झाला. यामुळे नागपुरातील मृत्युसंख्या 17 वर पोहोचली. आतापर्यंत मेडिकलमध्ये 9 तर मेयोत आठ मृत्यू झाले.
उपराजधानीत 8 जून रोजी बाधितांचा आकडा 718 वर होता. मात्र आठ दिवसनंतर 15 जूनपर्यंत 325 बाधितांची वाढ झाली. कोरोनाबाधिता प्रादुर्भाव उपराजधानीसाठी डोकेदुखी ठरत असतानाच मृत्युसत्रही सुरूच आहे. सोमवारी सकाळी मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलमध्ये मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला. त्यामुळे नागपुरात मृतांचा आकडा 17 वर गेला. 8 जून रोजी या व्यक्तीला मेडिकलमध्ये श्वसनाच्या आजारासाठी दाखल केले होते.
यावेळी पंधरा दिवसांपासून त्याला खोकला असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. निदानातून न्यूमोनियाचे निदान झाले. सोबतच फुप्फुसामध्येही संसर्ग असून हृदयाचाही त्रास होता. प्रकृती गंभीर होताच त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर 15 जून रोजी सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील कोरोनाबाधिताचा नागपूरच्या मेडिकलमध्ये झालेला हा दुसरा मृत्यू आहे. यापूर्वी 4 जून रोजी 62 वर्षीय महिलेचा कोरोनाच्या बाधेने नागपुरात मृत्यू झाला होता.
मेयो, मेडिकल एम्समध्ये 361 रुग्ण
दररोज दोन आकड्यातील रुग्णसंख्या आढळून येत असल्याने प्रशासनाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी आढळून आलेले सर्व कोरोनाबाधित पाचपावली व रविभवन विलगीकरणातील आहेत. शहरातील वस्त्यांमध्ये हळूहळू कोरोना पाय पसरत आहे. यामुळे शहरात आता धोका वाढला आहे. तर प्रशासनाची चिंताही वाढली आहे. नाईक तलाव, चंद्रमणीनगर, हुडकेश्वर रोड सावरबांधे सभागृहाजवळील रुग्ण आहेत. विशेष असे की, रामेश्वरी परिसरातील धाडीवाल ले-आउट, आर्यनगर आणि नरसाळा कोरोनाच्या नकाशावर आले. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. सध्या मेडिकल, मेयो आणि एम्समध्ये 361 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
शहरातील हॉटस्पॉट
नागपूर शहरातील मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत 17 मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे झालेले 12 मृत्यू हे शहरातील आहेत. तर उर्वरित पाच मृत्यू हे अमरावती, अकोला, मध्य प्रदेशातील आहेत. आहेत. शहरात 5 एप्रिल रोजी पहिला मृत्यू सतरंजीपुरा झोनमध्ये झाला होता. आतापर्यंत सतरंजीपुरा येथील 2 मोमिनपुरा येथील 3 मृत्यू झाले. याशिवाय 5 मे रोजी पार्वतीनगर येथील 22 वर्षीय तरुणाच्या मृत्यूसहित 11 मे रोजी पांढराबोडी आणि 16 मे रोजी गड्डीगोदाम, 17 मे रोजी शांतीनगर, 31 मे रोजी भिक्षेकऱ्यासहित हिंगण्यातील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यानंतर 8 जूनला हंसापुरीतील एक मृत्यू वगळता इतर सर्व मृत्यू हे बाहेरचे आहेत. अमरावती येथील दोन, मध्य प्रदेशातील 2 तसेच अकोल्यातील एक असे मृत्यू नागपुरात झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.