नागपुरातील निकालस मंदिर, भोईपुरा परिसरात शिरला कोरोना; मुंढेंनी घेतला हा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भागातील काही परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. प्रथमच कोरोनाबाधित आढळल्याने या परिसरात खळबळ माजली आहे. या वस्तीतील मार्गही बंद करण्यात आले.

नागपूर : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आज ना उद्या हजारचा पल्ला पूर्ण होऊन जाईल. मात्र, कोरोनाचा विषाणू दररोज नव्या क्षेत्रात पाय रोवत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शुक्रवारी निकालस मंदिर व भोईपुरा परिसरात कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या भागातील काही परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. प्रथमच कोरोनाबाधित आढळल्याने या परिसरात खळबळ माजली आहे.

गांधीबाग झोनअंतर्गत प्रभाग 22 मधील निकालस मंदिरासमोरीला कोष्टीपुरा चांदेकर मोहल्ल्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे या भागाच्या दक्षिण पश्‍चिमेस राजेंद्र भवन, उत्तर पश्‍चिमेस सुधीर पहेलवान यांचे घर, उत्तर-पूर्वेस अनिरुद्ध क्षीरसागर यांचे घर, दक्षिण पूर्वेस परसोडीकर डेकोरेशनपर्यंत परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.

संबंधित बातमी : कोरोना ब्रेकिंग : नागपूर लवकरच गाठणार हजारचा पल्ला; बाधितांची संख्या पोहोचली 960वर

याच झोनमधील प्रभाग क्रमांक 19 मध्ये भोईपुरा परिसरही महापालिकेने सील केला आहे. या परिसराच्या उत्तर पूर्वेस दुर्गेश गौर यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस भगीरथ गौर यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस गुरुदीप सिंग यांचे घर, दक्षिण पूर्वेस ज्योती नायक यांच्या घरापर्यंतच्या परिसरात निर्बंध लावण्यात आले आहेत. या वस्तीतील मार्गही बंद करण्यात आले. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तत्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्र वाऱ्यावर
गुरुवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी झिंगाबाई टाकळी परिसरातील मानमोडे ले-आउटमधील काही परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला होता. त्यामुळे या भागातील काही रस्ते टिना लावून बंद करण्यात आले होते. परंतु, पालिका अधिकाऱ्यांकडून टिना लावताना रस्त्याचा निम्मा भाग खुला सोडण्यात आला. एवढेच नव्हे येथे पोलिस कर्मचारी किंवा महापालिकेचा कर्मचारी नसल्याने नागरिकांनाही कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे.

खरं आहे का : विलगीकरणात महिलेला आली पाळी, संबंधिताने सॅनिटरी पॅड ऐवजी दिले हे...

शनिवारी वाढले अकरा रुग्ण
गेली दोन दिवस धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे शुक्रवारी शहराच्या विविध भागांत तसेच ग्रामीण भागातील 18 रुग्ण आढळून आले होते. शनिवारी यात अकरा रुग्णांची भर पडली. त्यामुळे उपराजधानीतील कोरोनाबाधितांची संख्या 960 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी निकालस मंदिर व भोईपुरा या नव्या भागात कोरोनाने प्रवेश केला होता. येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याने या भागात खळबळ माजली.

प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश
भोईपुरा व निकालस मंदिर या नव्या परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला होता. मेयो रुग्णालयात तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यांपैकी नऊ जणांना कोरोनाचे निदान झाले. यातील तिघे ग्रामीण भागातील रिधोरा व काटोल येथील आहेत. इतर सहा जणापैकी दोघे चंद्रमणीनगरातील असून, हबीबनगर, निकालस मंदिर, मोमिनपुरा, कोराडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona entered in two new areas of Nagpur